मुंबई : ‘‘आर्थिक स्वायत्तता असेल तर निवडीचे स्वातंत्र्य आणि अधिकार तुमच्याकडे सहज चालत येतात, हे लक्षात घेऊन स्त्रियांनी प्रथम आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. महिलांच्या स्वातंत्र्याचा मार्ग त्यांच्या कमाईतून जातो,’’ असे आग्रही मत दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी व्यक्त केले. लहानपणापासूनच स्वत:चे मत, विचार जपण्याचे मिळालेले बाळकडू आणि भिन्न सामाजिक, आर्थिक स्तराच्या, स्वभावाच्या माणसांमध्ये राहून जमा झालेली अनुभवांची शिदोरी यातूनच चित्रपटांचे विषय, व्यक्तिरेखा कशा सापडत गेल्या, यांवर झोया अख्तर यांनी ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात मनमोकळेपणे आपले अनुभव मांडले.

मराठी- हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर नावाजलेली अभिनेत्री आणि लेखिका अमृता सुभाष यांनी शुक्रवारी झालेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला. झोया अख्तर यांचे आई- वडील दोघेही हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रथितयश लेखक, गीतकार असल्याने अगदी नकळत्या वयात चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले लेखक, दिग्दर्शक, कलाकार, गीतकार मंडळींचा सहवास लाभल्याचे त्यांनी सांगितले.

घरी आर्थिक सुबत्ता होती, आई-वडील दोघेही वैचारिक बैठक असण्यावर जोर देणारे असल्याने निर्णयाचे स्वातंत्र्यही लहानपणापासून अनुभवलेले होते, पण घरात सगळ्याच अर्थाने सुबत्ता असली तरी त्यांनी कधीही आम्हाला मोठमोठ्या गाड्यांमधून फिरवले नाही. झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सलग पाच वर्षे मी ट्रेनमधून प्रवास केला.

मोठमोठ्या लोकांमध्ये जसे आम्ही वावरत होतो, तसेच आमच्या कार्यालयात, घरी काम करणारी मंडळी, चित्रपटात काम करणारे तंत्रज्ञ यांच्याशीही आमचे बोलणे व्हायचे. या प्रत्येकाकडून जे जे काही विचारधन मिळत गेले, त्या संचिताचा उपयोग पुढे आयुष्यात आणि कलाप्रवासात कसा झाला, हे झोया यांनी आपल्या प्रत्येक बारीकसारीक आठवणीतून उलगडले.

कुठलाही भेदाभेद न मानता असा निर्मळ जगण्याचा आनंद दिल्याबद्दल आई-वडिलांचे आभार त्यांनी मानलेच, पण माणूस म्हणून सभोवतालचे जगणे आपण असेच खुलेपणाने अनुभवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आजुबाजूची माणसे कशी राहतात, त्याचे जगण्यावर परिणाम करणार्‍या या व्यवस्था कोणत्या हे आपल्याला माहिती करून घेतले पाहिजे. गरीब-श्रीमंत ही वर्गवारी कोणी ठरवलेली नाही, आपणच ही वर्ग व्यवस्था आपल्यावर लादून घेतली आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी झोया यांनी आपले लेखन, कविता, वाचन तसेच जगातील विविध भाषांतील चित्रपट पाहण्याची आवड या सगळ्याचा आपल्या अभिव्यक्तीवर प्रभाव पडला असल्याचे सांगितले. समाजशास्त्र आणि साहित्याच्या अभ्यासातून मिळालेली समज चित्रपटांच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करते असेही त्या म्हणाल्या.

 सध्या एकमकांबरोबर सहज बोलणेच आपण विसरून गेलो आहोत, एकतर्फी संवादच समाजात वाढत चाललेला असताना ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रम पुन्हा तुमच्यासमोर आणण्यात आनंद वाटतो’ अशा शब्दांत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी झोया अख्तर यांचे या गप्पांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आभार मानले. एम. के. घारे ज्वेलर्सच्या शुभा घारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन झोया अख्तर यांचे स्वागत करण्यात आले.

विविध मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला मोनिका गजेंद्रगडकर, अरुण शेवते, प्रिया बापट, उमेश कामत, रोहन चंपानेरकर, प्रदीप चंपानेरकर, प्रज्ञा दया पवार, विजय केंकरे, वैभव मांगले, अजय वाळिंबे, कांदबरी कदम, डॉ. अनिल बांदीवडेकर, कौस्तुभ जोशी, संदेश कुलकर्णी, अजित भुरे, डॉ. राजेंद्र बर्वे, ज्ञानेश झोटिंग, सायली राजाध्यक्ष, निरंजन राजाध्यक्ष, वैजयंती आपटे,डॉ. श्वेता पेंडसे आणि तुषार दळवी यांसह मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, वस्तू आणि सेवा कर विभागाचे उपायुक्त राजेश गायकवाड, उपमुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.