शारीरिक खेळ, स्पर्धा, कसरत, नृत्य म्हटलं की जेवढी ह्य गोष्टींची आकर्षक बाजू दिसते, तितकीच आव्हानंदेखील ह्य क्षेत्रातील व्यक्तींना पेलावी लागतात. असाच एक अडथळा किंवा आव्हान म्हणजे अशा क्षेत्रात कार्य करत असताना होणाऱ्या ‘शारीरिक दुखापती किंवा इजा!’
फुटबॉल, कबड्डी, कुस्ती असे मैदानी खेळ खेळताना खेळाडूंना होणाऱ्या शारीरिक इजा आपण अनेकदा बघत असतो. परंतु नर्तकांच्या बाबतीत असे प्रसंग बरेचदा त्यांच्या शिक्षणाच्या किंवा तालमीच्या वेळी घडतात. त्यावर मात करून नृत्याचं सादरीकरण केलेला कलाकार आपण बघतो, परंतु अशा दुखपतीनंतर पुन्हा सादरीकरण करण्यापर्यंत नर्तक- नर्तिकांनी केलेला संघर्ष, घेतलेली कठोर मेहनत मात्र बरेचदा अंधारातच राहते. हा विषय कलाकारांसाठी नाजूक, हळवा पण तितकाच जिद्द देणारा, नवीन स्फूर्ती देणारा आहे! ‘नाचू आनंदे’च्या सदरातील ह्या शेवटच्या लेखात हा विषय रसिकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटा प्रयत्न!
नृत्यात शरीराची इजा, दुखापत ही एका अपघातासारखीच घडते. कुणी न ठरवता, बहुतांशी वेळा कुणाची चूकही नसताना, न टाळता येणारी एक घटना! पण अर्थातच जर दुखापत मोठय़ा प्रमाणावर झाली असेल, फ्रॅक्चर किंवा शस्त्रक्रिया करण्याइतपत गंभीर असेल तर ती खेळाडूंप्रमाणेच नर्तकालादेखील अत्यंत अस्वस्थ करून सोडते. आपला श्वास असलेल्या कलेपासून काही काळ दूर राहण्याचा विचारही कलाकाराला असहायतेची जाणीव करून देतो आणि शरीरापेक्षाही जास्त बहुतेक वेळा कलाकाराचं मन दुखावलं जातं.. बऱ्याच लोकांच्या सल्ल्यांचा, सहानुभूतीचा जणू भडिमार व्हायला लागतो. या परिस्थितीशी झुंज देण्यासाठी नर्तक- नर्तिका प्रयत्नंची पराकाष्ठा करायलाही तयार होतात. नर्तकांसाठी खरं तर ‘शरीर’ हे सर्वस्व असतं; परंतु बरेचदा आपण आपल्या शरीरालाच गृहीत धरतो, आवश्यक तो आराम देत नाही अशी जाणीव शारीरिक दुखपतीनंतर कलाकाराच्या मनाला होऊ लागते. आणि मग कधी कधी ही जाणीवच ह्य ‘सक्तीच्या विश्रांतीकडे’ बघण्याचा कलाकाराचा दृष्टिकोन बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
त्यामुळे दुखपतीनंतर परत सादरीकरण करण्याच्या ह्या अवघड प्रवासात खरं तर पहिली पायरी असते ती म्हणजे ही दुखापत मान्य करून, डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं आणि आवश्यक विश्रांती घेणं! पण बरेचदा ही पहिली पायरी चढायलाच कलाकार विलंब करतात, त्यामुळे दुखापत अधिक गंभीर स्वरूप घेते आणि अर्थातच त्यामुळे दुखापत बरी होण्यास लागणारा कालावधीदेखील वाढतो.. कारण दुखापत झालेली असताना तशाच अवस्थेत, किंवा तात्पुरता इलाज करून नृत्य चालू ठेवले जाते. पण त्यामुळेच किंबहुना योग्य आराम न मिळाल्याने दुखापत गंभीर होते! ही पहिली पायरी कठीण असली तरी लांबवरच्या ध्येयासाठी मात्र आवश्यक ठरते. यानंतर दुसरी पायरी म्हणजे नियमित उपचार – ज्यामध्ये डॉक्टरांची औषधे व फिजिओथेरपीचे व्यायाम ह्याचा मोठा वाटा असतो. त्याचबरोबर अशा घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन उपचारामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. इजा तात्पुरती आहे, योग्य उपचारांनी ती बरी होणार आहे व काहीतरी नवं शिकायची ही उत्तम संधी आहे असा सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच उपचारांना गती देण्यास पोषक ठेवतो. नाहीतर नकारात्मक, असहायतेची भावना मन पोखरायला लागते आणि आपण जिद्दच हरवून बसतो, पण उलटपक्षी सकारात्मक विचार मात्र अशा कठीण प्रसंगातूनच नव्याने भरारी घेण्याची जिद्द देतात आणि मन खंबीर बनवतात. दुराव्याने प्रेम वाढतं असं म्हणतात ते कलेच्या बाबतीतसुद्धा खरं ठरतं.. कलेपासून, नृत्यापासून काही काळ दूर गेल्याने अनेकांचं कलेवरचं प्रेम द्विगुणित होतं, ह्या प्रेमाचे नवे अर्थ सापडायला लागतात आणि आपल्या अस्तित्वाचं ह्या कलेशी असलेलं अतूट नातं अधिकच दृढ होतं! कदाचित नृत्याच्या सदारीकरणापासून काही काळ दूर राहावे लागले तरी विविध कार्यक्रमांना जाणं, वाचन करणं, नृत्याविषयी स्वत:चा विचार करायला वेळ काढणं अशा विविध गोष्टींतून नृत्यासोबतचा संपर्क मात्र कायम ठेवता येतो. तसेच इतर छंद जोपासायलासुद्धा वेळ काढणं शक्य होतं- मात्र ते करण्याची इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे! अशा कठीण प्रसंगातून जात असताना कलाकारांना बळ देतात ते म्हणजे अशा प्रकारच्या प्रसंगावर मात करून नावारूपाला आलेल्या व्यक्तींचे अनुभव! अशा उदाहरणातून कलाकाराला अजून नव्या ताकदीने उभं राहण्याची प्रेरणा मिळते..
नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात अशी प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे ‘सुधा चंद्रन!’ वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून नृत्य शिकणाऱ्या सुधा चंद्रन यांचा वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा पाय गमवावा लागला. परंतु जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला व नव्या उमेदीने परत नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्याबरोबरच अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या व त्यांचा प्रवास आजही अविरत चालू आहे. ह्य पूर्ण प्रवासाबद्दल ‘लोकप्रभा’शी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ‘‘माझा अपघात, माझी दुखापत ह्यतून मी खूप काही शिकले. सुरुवातीला अर्थात नैराश्य आलं; एकुलती एक मुलगी असल्याने आईवडिलांच्यापण माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, समाजकडूनसुद्धा माझ्याबद्दल सहानुभूतीची भावना दाखवली गेली; सहानुभूती आणि आधार यातील सूक्ष्म रेषा सगळ्यांनाच सांभाळता येत नाही ना.. पण वारंवार ‘माझ्याबरोबरच असं ‘का’ झालं?’ हा प्रश्न मला पडायचा, उत्तर मात्र मिळायचं नाही..मग त्याचं उत्तर मी माझ्या कृतीतून द्यायचं ठरवलं. नृत्याबद्दची आस्था, प्रेम, स्वत:बद्दलचा विश्वास आणि स्वत:चं ध्येय गाठण्याची जिद्द- या सगळ्या गोष्टींनी मला नवीन उमेद दिली!! सुरुवातीला नक्कीच ‘जयपूर फूट’ सारख्या कृत्रिम पायाबरोबर नाचताना खूप त्रास व्हायचा.. आपल्याला नवीन किंवा नावडत्या कपडय़ांतसुद्धा ‘अ‍ॅडजस्ट’ व्हायला किती वेळ लागतो! इथे तर एका कृत्रिम अवयवाबरोबर मी ‘अ‍ॅडजस्ट’ करत होते..पण जेव्हा मी त्या कृत्रिम पायाला माझ्या शरीराचा एक भाग म्हणून पाहायला लागले तेव्हा गोष्टी माझ्यासाठी सोप्या होत गेल्या.. कृत्रिम पायानेही खूप काही करता येऊ शकतं ह्याची प्रचीती आली. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर कुठलेही आव्हान झेलण्याची ताकद मिळते. आणि मला असं वाटतं की रोज एक नवीन आव्हान आपल्यासमोर असेल तर जगण्यात मजा आहे! आज माझ्या डान्स अकॅडमीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रगती बघून मला नक्कीच खूप अभिमान वाटतो..नृत्याकडे बरेच जणं आता व्यावसायिक पर्याय म्हणून बघायला लागलेत, तसंच समाजाचासुद्धा नृत्यकलेकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय.. याचा मला अत्यंत आनंद होतो. माझं सर्वाना हेच सांगणं आहे की, नवीन गोष्टी शिका, प्रत्येक संधीचा वापर करा आणि जीवन समृद्ध करा.. कारण हीच जीवनाची सुंदरता आहे; ती अनुभवायला शिका!’’ खरंच सुधाजींचा अनुभव, प्रवास थक्क करणारा आणि सर्वानाच नवीन आशा, प्रेरणा देणारा आहे..
त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारी, मानाचा समजला जाणारा ‘छत्रपती क्रीडा पुरस्कार’ विजेती- कथक नर्तिका व जिम्नॅस्टिक्सपटू ‘पूजा सुर्वे’ने तिच्या अनुभवांबद्दल ‘लोकप्रभा’शी मनमोकळा संवाद साधला. लहानपणापासूनच नियमित जिम्नॅस्टिक्स करत असलेल्या पूजाला गुडघ्याला सरावादरम्यान दुखापत- लिगामेंट इन्जुरी झाली, तिच्या जिम्नॅस्टिक्सच्या, नर्तनाच्या प्रवासात खंड पडला.तब्बल ६ महिने ती कुठल्याच स्पर्धेत भाग घेऊ शकली नाही, सरावसुद्धा करू शकली नाही. मात्र जिद्द न गमावता तिने परत शून्यापासून सुरुवात केली. ह्या प्रवासात आईवडील, शिक्षक, फिजिओथेरपिस्ट यांची मोलाची मदत झाली असं पूजा आवर्जून सांगते. तसंच देवाची कृपा आणि स्वत:ची जिद्द ह्य बळावर ती परत जेव्हा स्पर्धेत उतरली तेव्हा ‘सुवर्णपदक’ पटकावूनच नव्याने करिअरला सुरुवात केली!! दिल्ली येथे झालेल्या ‘कॉमन वेल्थ’ स्पर्धेमध्ये भारताच्या संघातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मानही पूजाला मिळाला!! आज पूजा २५० हून अधिक विद्यार्थिनींना जिम्नॅस्टिक्सचं प्रशिक्षण देत आहे आणि अनेक नवीन खेळाडू, नर्तकांसाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे..
सुधा चंद्रन, पूजा सुर्वे अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात; फक्त त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन स्वत:चा लढा मात्र स्वत:लाच द्यावा लागतो.जीवन कधीच एकसुरी नसतं; अशा कठीण प्रसंगातच आपली, आपल्या कलेवरच्या प्रेमाची खरी कसोटी असते. अशा शारीरिक दुखापतीकडे खूप मोठा दु:खद प्रसंग म्हणून न बघता आयुष्याच्या वाटेवरील एक वेगळं वळण म्हणून पाहिलं तर नक्कीच त्यातून मार्ग शोधणं सोपं होईल!! शेवटी एक आपुलकीचा सल्ला म्हणून सांगू इच्छिते; अशा दुखापती, अपघात जरी अचानकपणे घडणारे असले तरी त्या दुखापतींची तीव्रता कमी करण्यासाठी काही काळजी घेणंही प्रत्येक नर्तकाचं कर्तव्य आहे. नृत्य फिटनेससाठी करत असाल तरी नृत्यासाठीसुद्धा फिटनेस महत्त्वाचा आहे.नृत्याची तालीम चालू करताना ‘वॉर्मअप’ करणं खूप गरजेचं आहे. बरेच नर्तक वॉर्मअप, स्ट्रेचिंगशिवाय थेट नृत्य करायला सुरुवात करतात. त्यामुळे अशा वेळी दुखापत होण्याची शक्यता वाढते आणि जर अशा वेळेला इजा झाली तर त्याची तीव्रताही अधिक असते.त्यामुळे, नृत्याच्या आधी वॉर्मअप, बेसिक व्यायाम करणं मस्ट आहे!! आणि सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे कलेवरील, नृत्यावरील श्रद्धा- कारण हे नृत्यावरचं प्रेमच नव्याने भरारी घेण्यासाठी आपल्या पंखात ताकद देतं, पायात शक्ती देतं आणि मनात ध्येय गाठण्याची ज्योत सदैव तेवत ठेवतं. धीर धरून, ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहणं आपलं आयुष्य, आपला अनुभव समृद्ध करतं.
तेव्हा कुठल्याही प्रसंगात कलेवरचं प्रेम कमी होऊ देऊ नका, स्फूर्तीची ठिणगी कधी विझू देऊ नका.नृत्याची, कलेची साधना अविरत चालू ठेवा. तुम्हीसुद्धा इतरांसाठी प्रेरणास्थान ठरू शकता. ‘कीप डान्सिंग, कीप शायनिंग’!!
तेजाली कुंटे -response.lokprabha@expressindia.com
(समाप्त)