भारतीय नर्तनकला ही भारतीय संस्कृतीइतकीच प्राचीन आहे, भारतीय नर्तनाचा इतिहासही सबळ पुराव्याअभावी सांगोवांगी आणि दंतकथांवर अवलंबून आहे असे असले, तरी त्या काळी नृत्यकलेचा विकास त्या काळच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचला होता. भारतीय परंपरेने नृत्याचा जन्मदाता भगवान श्रीशंकरांना मानले आहे.

लयबद्ध आणि डौलदार हालचालीतून मूíतमंत गतिमानता प्रकट करणारी, तसेच चेहऱ्यावरील व हालचालीतील भावविभ्रमातून, भाषेच्या मर्यादांचे कुंपण ओलांडून, भावनेची रसोत्कटता रसिकांपर्यंत पोहोचवणारी एक समर्थ कला म्हणून नृत्यकलेची ओळख आहे. नृत्य या शब्दाचा मूळ धातूच मुळी ‘नृ’ हा आहे आणि भाष्यकार पतंजलीने या नृ धातूपासून नृत्य या शब्दाची व्युत्पत्ती मान्य केली आहे. नृत् शब्दाचा अर्थच शरीराच्या विभिन्न भागांचे हलणे-डुलणे असा मानला गेला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत नृत्यकला ही महत्त्वपूर्ण कला मानली जात असे.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

नृत्याच्या विकासावर दृष्टिक्षेप टाकणारा सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे भरतमुनींचे ‘नाटय़शास्त्र’ हा होय. या ग्रंथात नाटय़ाच्या उद्गमाविषयी मोठा रोचक व आकर्षक इतिहास कथन केला आहे. नाटय़शास्त्रात असे म्हटले आहे की, ज्या वेळी त्रेतायुग सुरू झाले तेव्हा माणसामाणसांत हेवेदावे, दु:ख, ईर्षां, द्वेष यांसारखे दोष निर्माण होऊन याद्वारे दु:खाची निर्मिती झाली. कलह माजला. सारा समाज दु:खी-पीडित झाला. तेव्हा देवराज देवेंद्र ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवास विनंती केली. देवांनी ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली की मनोरंजनासाठी असे काही साधन उपलब्ध करून द्या की ज्याद्वारे सर्व संसार आश्चर्यचकित होऊन जाईल. तेव्हा ब्रह्मदेवाने सर्व वेदांच्या सारातून ‘नाटय़शास्त्र’ हा पाचवा वेद निर्माण केला व आचार्य भरतमुनींना तो दिला. ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे भरतमुनींनी आपली मंडळी घेऊन कैलासपर्वतावर ‘त्रिपुरदाह’ नामक नाटकाची प्रस्तुती केली. भरताने गंधर्व, अप्सरा आणि किन्नर यांची मदत घेऊन भगवान शंकरासमोर सर्वप्रथम ‘त्रिपुरदाह’ आणि मग ‘अमृतमंथन’ नावाचे दोन प्रयोग सादर केले. भगवान शंकर ते पाहून भरतमुनींवर खूश झाले. तेव्हा भगवान शंकरांनी या नाटकात नृत्याचा समावेश करण्यास सांगितले. भारतीय परंपरेनुसार भगवान शंकरांना नृत्यकलेचे प्रथमप्रवर्तक मानले जाते. नृत्यकलेची उपासना, आराधना करणारे सर्व नर्तक नटराजाची प्रार्थना करून आपली साधना सुरू करतात. असे मानतात की भगवान शंकर रोज संध्यासमयी धुंद होऊन नर्तन करतात, त्यांच्या या आनंदनर्तनात सर्व देवता सामील होतात. ब्रह्मदेव ताल धरतात, सरस्वती वीणावादन करते, विष्णू मृदुंग वाजवतात, अप्सरा व किन्नरी श्रुतींकडे लक्ष ठेवतात, नारद तुंबरू गायन करतात, नंदी आणि भृंगी डमरू आणि मादल वाजवितात, शिवशंकराच्या पदाघाताने पृथ्वी थरथरून उठते, तर हातांच्या संचलनाने आकाशमंडल गतिमान होते. शंकराचे विराट नृत्य पाहून पार्वतीदेवीसही नृत्य करण्याची स्फूर्ती आली, पार्वतीने केलेले सुकोमल, मोहक नृत्य ‘लास्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान शंकरांनी आपला प्रिय शिष्य तंडू मुनीस आदेश दिला की भरतमुनींना नृत्यकलेचे ज्ञान दे आणि अशा प्रकारे तंडूकडून शिकवले गेले ते ‘तांडवनृत्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले.  भरतमुनींनी ‘तंडू’ याच्याकडून तांडवनृत्याची, तर पार्वतीकडून ‘लास्य’ या नृत्याची तालीम आपल्या दोन्ही पुत्रांना दिली.

तंडूमुनींकडून शिकलेल्या नर्तनाला ऋषीमुनींनी तांडव नृत्यकला म्हणून मनुष्य लोकात प्रचारात आणली. पार्वतीनेही बाणासुराची कन्या उषा हिला लास्य नृत्याचे शिक्षण दिले. उषाने द्वारकेला येऊन गोपींना नृत्य शिकवले. गोपींनी सौराष्ट्रातील महिलांना ते नृत्य शिकवले, याच नृत्याला भगवान श्रीकृष्णाने ‘रास’ या समूहनृत्याचे स्वरूप दिले आणि अशा रीतीने पृथ्वीतलावर नृत्याचा जन्म म्हणजेच उत्पत्ती झाली.

हडप्पा मोहेंजोदडोमध्ये जी मूर्ती सापडली त्यामुळे नृत्याचे पहिले स्वरूप लक्षात आले. त्या प्रतिमांवरून असे स्पष्ट होते की तत्कालीन जनजीवनात नृत्याला महत्त्वपूर्ण स्थान होते. अशाच प्रकारे लोथल, मिर्जापूर, पटना, काथियावाड, उदयगिरी, महाबलीपुरम् इत्यादी प्रागतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेल्या कलासाधनांमध्ये नृत्य व अभिनयाशी संबंधित वस्तूंचा समावेश होता. असेच काही ऐतिहासिक पुरावे आजही आपल्याकडे उपलब्ध आहेत.

१) रामायण : वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या रामायणाचा रचनाकाळ इ. स. पू. १६०० मानला जातो. या काळात संगीताच्या तीनही अंगांची म्हणजेच गायन, वादन आणि नृत्याची स्पृहणीय प्रगती झाली. गायन, वीणावादन व नर्तनाची विशेष झलक रामायणात दिसून येते. यज्ञाच्या वेळी सामगायन होत असे. लग्न, मुंज, बारशाच्या वेळी गांधर्व संगीताचा उपयोग केला गेला. गंधर्व गातात त्याचे शास्त्र म्हणजे शास्त्र गांधर्व. रामायणात सुख-दु:खाच्या प्रसंगी संगीताचा विशेष वापर केला गेला. रामजन्म, रामविवाह तसेच राज्याभिषेकाच्या वेळी विविध प्रकारची नृत्याची प्रस्तुती त्या प्रसंगी झाली. रावणाच्या कैदेत हनुमान असताना त्याने महालात नृत्य पहिले. त्याच कालावधीत समूह नृत्यरचनाही होत असत. नट-नटय़ा विविध प्रसंगांवर नाटक सादर करत असत. युद्धाच्या सन्याबरोबर नट आणि नर्तक असत. रामायणाच्या काळात जर राजाच संगीताचा जाणकार होता, तर त्याची प्रजा का नसणार? म्हणूनच या काळात गायन, वादन आणि नृत्य या तीन संगीत अंगांची उन्नती झाली.

२) महाभारत : इ. स. पू. ११०० मध्ये ‘महाभारत’ हे महर्षी व्यास यांनी रचले. रामायणाच्या काळात समाजात शास्त्रीय नृत्याविषयी जी आवड निर्माण झाली त्याचा पूर्ण विकास महाभारताच्या काळात झाला. महाभारतातल्या प्रमुख पात्रांमध्ये नर्तकांची संख्या अधिक होती. या कथेचे सूत्रधार भगवान श्रीकृष्णाचे नावच नटवर असे होते. श्रीकृष्णाने संपूर्ण वृंदावनात गोपींबरोबर रासनृत्य करून संपूर्ण जगताला मोहित करून टाकले. महाभारतातही विविध उत्सवाच्या वेळी गायन, वादन, नर्तनाची प्रस्तुती होत असे. अर्जुनाने नृत्याचे शिक्षण स्वर्गाची अप्सरा उर्वशी हिच्याकडून घेतले.

त्याचप्रमाणे भारतीय नृत्यामध्ये वैदिक साहित्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. नृत्य हा केवळ भारतीय शब्द नसून वैश्विक साहित्याच्या शृंखलेतही खूप प्राचीन आहे. नृत्याचा विशेष प्रयोग वैदिक साहित्यात आपल्याला बघायला मिळतो. अशी ही भगवान शंकरांपासून उगम पावलेली ही नृत्यकला विकासाची विविध वळणे पार करून इथवर येऊन पोहोचली आहे. तिचा प्रवास असाच चालू राहील आणि मानवाला आनंद देण्याचे काम ही कला सदैव करत राहील.

शीतल कपोले – response.lokprabha@expressindia.com