जिभेला हवेहवेसे वाटणारे पदार्थ पोटाला आणि अर्थातच हृदयाला चांगले असतातच असे नाही. त्यामुळेच हृदयाचा विचार केला तर आपल्याला गरजेचे असतात ते तंतुमय पदार्थ. ते पचनासाठी कशी मदत करतात?

‘हृदयविकार कमी होऊ शकतो’ असा दावा करणारे अमेरिकेतील डॉ. डीन ऑर्निश एम. डी. हे एक सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ होते. त्यांचे रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज (Reversal of Heart Disease) हे पुस्त क खूप गाजले.

alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

डॉ. डीन ऑर्निश यांनी औषध .. शस्त्रक्रिया यांसारख्या पारंपरिक उपायांच्या जोडीलाच ध्यान, योग, व्यायाम, योग्य आहार, मनावरील ताणतणाव कमी करणे यांसारख्या गोष्टींचाही हृदयविकार कमी करण्यात मोठा वाटा असतो असे म्हटले आहे.

हृदयविकार होण्यात आहाराचा विशेषत: आहारातील कोलेस्टेरॉल आणि चरबी यांचा मोठा वाटा असतो. कोलेस्टेरॉल आणि स्निग्ध पदार्थ भरपूर असलेल्या आहारामुळे हृदयविकार प्रमाण वाढू शकते, असे अनेक संशोधनांमध्ये दिसून येते.

नंतर आहार आणि आजार- हृदयविकार यांबद्दल बरंच संशोधन झाले. आहाराबद्दल खूप शास्त्रीय माहिती उपलब्ध आहे.

‘व्हॉट यू ईट टुडे वॉक्स टुमॉरो’ (What you eat today, walks tomorrow)  याचा अर्थ असा की जो आहार तुम्ही आज घेता त्याप्रमाणे तुमची प्रकृती उद्या (भविष्यात) राहील. जर तुम्ही असा आहार घेतलात तर तुमचं शरीर ही व्यवस्थित कार्य करू शकते.

आहाराची योग्यता त्यात असणाऱ्या घटकांच्या प्रमाणावर, त्यात असलेल्या कबरेदकांच्या, प्रथिनांच्या व्हिटामिन्सच्या/जीवनसत्त्वांच्या, उष्मांकाच्या प्रमाणावर ठरवली जाते.

निरोगी आणि कार्यक्षम राहण्यासाठी योग्य असा आहार घ्यायला पाहिजे. हे आता आपल्याला माहीत आहे. काही विशेष परिस्थितीमध्ये आहारात बदल करायला हवे, त्या त्या परिस्थतीनुसार आहार घ्यायला हवा, हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे. उदा. कावीळमध्ये तेलाचे पदार्थ खाऊ नये. मधुमेहाच्या रुग्णाने साखर, गूळ, खाऊ नये. गर्भवती स्त्रियांनी भरपूर फळे, दूध आणि पौष्टिक आहार घ्यावा.

त्याच प्रमाणे हृदयरोग असणाऱ्यांनी कोलेस्टेरॉल खाऊ नये, हे आता बहुतेक सर्वाना माहीत असते. पण कोलेस्टेरॉल जोडीलाच संपृक्त स्निग्धांश एवढंच नव्हे तर असंपृक्त स्निग्धांशही (वनस्पतीजन्य तेल) जास्त खाऊ नये हे मात्र अजूनही खूप लोकांना माहीत नाही.

आपल्या शरीरातच कोलेस्टेरॉल तयार केले जात असल्यामुळे आहारात कोलेस्टेरॉल खाऊन शरीरात तयार होणाऱ्या कोलेस्टेरॉलमध्ये भर घालू नये.

तसेच ज्या पदार्थामुळे कोलेस्टेरॉल निर्माण होईल असे पदार्थपण आहारातून वज्र्य करावेत. (काही पदार्थामध्ये कोलेस्टेरॉल निर्माण करणारा संपृक्त स्निग्धांश असतो. (saturated fat) बहुतेक सर्व प्राणिजन्य पदार्थामध्ये संपृक्त स्निग्धांश (saturated fat)असते तर वनस्पतीजन्य पदार्थामध्ये संपृक्त स्निग्धांश कमी असतात. दूध, मटण, चिकन, लोणी, अंडय़ातला बलक, (पिवळा भाग) यांसारख्या पदार्थामध्ये कोलेस्टेरॉल असते आणि संपृक्त स्निग्धांशही असतो.

शेंगदाणा तेल, करडईचे तेल अशा प्रकारच्या तेलांमध्ये कोलेस्टेरॉल फार कमी असते किंवा नसते पण थोडय़ा प्रमाणांत संपृक्त स्निग्धांश असतो.

त्यामुळे हृदयरोग्यांनी अशा तेलाचा वापर कमी करावा. असे निकर्ष डॉ. डीन ऑर्निश यांनी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आहारात कोलेस्टेरॉल वज्र्य करावे आणि चरबी किंवा स्निग्धांश अगदी थोडय़ा प्रमाणात घ्यावे. साय, तूप, लोणी, चीज यांसारखे पदार्थ वज्र्य करावेत.

साय काढलेले दूध आणि त्यापासून बनवलेले दही, ताक घेण्यास हरकत नाही.

आहारामध्ये कोलेस्टेरॉल, संपृक्त चरबी.. स्निग्धांश यांवरच र्निबध आहेत. जर आपण शाकाहार घेता तर.. मुळात शाकाहार पदार्थामध्ये कोलेस्टेरॉल आणि स्निग्धांश नसल्यामुळे किंवा खूप कमी असल्यामुळे, काळजी करण्याचे कारण नाही. शिवाय शाकाहारमध्ये उष्मांकही कमी प्रमाणात असल्यामुळे हृदयरोग्यांना उत्तमच आहे.

दैनंदिन आहारापासून मिळणाऱ्या एकंदर ऊर्जेपैकी ५५ ते ६० टक्के कबरेदकापासून, २० ते २५ टक्के प्रथिनांपासून आणि १० ते १५ टक्के स्निग्ध पदार्थापासून मिळायला हवे.

काही खाद्यवस्तूंपासून फक्त कॅलरीज उष्मांकाची भर पडते. पोषकद्रव्याची नाही. उदा. साखर, थंड पेय, मैदा इत्यादी. यातून मिळणाऱ्या उष्मांकाना ‘रिकामे उष्मांक’ म्हणतात. (Empty Calaries)

१ ग्रॅम कबरेदके, १ ग्रॅम प्रथिने यांपासून प्रत्येकी चार उष्मांक मिळतात तर १ ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून ९ उष्मांक मिळतात. हे उष्मांक दैनंदिन कार्य करायला उपयुक्त पडतात.

नित्याचा आहार आपण जो घेतो, तो योग्य पोषण देणारा असणे आवश्यक आहे. बाल्य अवस्थेत शरीराची योग्य वाढ व बौद्धिक विकास करणारा आहार हवा. नंतरच्या वयात शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणे, शारीरिक व मानसिक चलनवलन करणे, बुद्धीला चालना देणे यांसाठी आहारात बदल महत्त्वाचा असतो.

शरीराला पोषण देणारी द्रव्ये खाद्य पदार्थामधून मिळतात. खाद्यपदार्थ दोन प्रकारचे असतात- वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य!

पोषक द्रव्ये आपल्याला वेगवेगळ्या पदार्थापासून मिळतात. त्यात धान्ये (cereals), डाळी (Pulses), कडधान्ये (legumes), भाजीपाला, फळे, सुकामेवा, दूध-दुभत्याचे पदार्थ, खाद्य तेले, तेलबीजे, मांसाहारी पदार्थ, अंडी, मासे, मसाल्याचे पदार्थ यांचा समावेश होतो.

पोषक द्रव्ये विरहित खाद्यवस्तू – पाणी ही पण एक अत्यावश्यक गोष्ट आहे.

आहारातील पोषक द्रव्ये. कबरेदके (cerbony- drates), स्निग्धपदार्थ, (fats), प्रथिने (proteins), जीवनसत्त्वे (vitamins), खनिजे (Minerals) ही पोषक द्रव्ये व पाणी प्रत्येक खाद्य वस्तूत कमी-अधिक प्रमाणात असतात.

काही खाद्य वस्तूंपासून निव्वळ उष्मांकाची भर पडते, त्यात पोषक द्रव्ये नसतात. अशा उष्मांकाना ‘रिकामे उष्मांक’ म्हणतात. (empty calories) उदा. साखर, शीतपेये, मैदा इत्यादी.. या गोष्टी शरीराला उपायकारक आहेत, जर आवश्यकतेपेक्षा जास्त घेतले तर!

तंतू वगळता सर्व प्रकारच्या कबरेदकांचे पचन मार्गात पचन होऊन त्यापासून मुख्यत: ‘ग्लुकोज’ तयार होते. ग्लुकोजचे लहान आतडय़ात शोषण होऊन ते रक्तात जाते. त्यातील काही ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाते आणि काही ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर होऊन ते लिव्हर आणि स्नायूंमध्ये साठवले जाते. उरलेल्या ग्लुकोजचे चरबीत रूपांतर होऊन साठवले जाते. ऊर्जेच्या आवश्यकतेप्रमाणे ग्लायकोजनपासून पुन्हा ग्लुकोज तयार होऊ शकते.

तंतुमय पदार्थ (तंतू- फायबर)

आपल्या आहारातला न पचणारा आणि शरीराबाहेर टाकला जाणारा भाग म्हणजे फायबर किंवा तंतुमय पदार्थ. पण शरीराबाहेर टाकले जाणारे पदार्थ निरुपयोगी मात्र असतात.

थोडक्यात तंतू म्हणजे वनस्पतीचा सांगाडा. त्याचे मानवी पचन मार्गात  पचन होते नाही. पाण्यात विरघळण्याऱ्या तंतूचे पचन मार्गात फक्त विघटन होते. त्यापासून उष्मांक किंवा ग्लुकोजची उत्पत्ती होत नाही किंवा अत्यंत कमी प्रमाणात होते.

फायबर हे दोन प्रकारचे असतात.

१) अद्राव्य (विरघळणारे)

२) विद्राव्य (न विरघळणारे)

सर्व वनस्पतीजन्य खाद्यवस्तूत तंतू कमी-अधिक प्रमाणात आढळतात. विशेषत: देठांसकट पालेभाज्या, शेंगभाज्या, फळे, धान्याचा कोंडा, भाज्यांच्या फळांच्या साली, डाळी कडधान्यांच्या साली यामध्ये भरपूर तंतू असतात.

तंतूंचे फायदे :

  • बराच वेळ चावावे लागल्यामुळे तोंडात अधिक लाळ तयार होते. लाळेमुळे खाल्याचे समाधान मिळते आणि अन्न पचन व्हायला मदत होते. आणि लाळेमुळे जंतू मरण्यास मदत होते.
  • तंतू असणाऱ्या खाद्यांमध्ये कमी उष्मांक असतात. त्यामुळे तंतुमय पदार्थ अधिक खाल्यास जास्त उष्मांक असलेले खाद्यपदार्थ कमी खाल्ले जातात. म्हणजेच एकंदरीतच कमी उष्मांकाचे ग्रहण होते.
  • तंतूमुळे अन्नाचा आकार वाढल्यामुळे पोट भरलेले राहाते, लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  • तंतूचे पचन होत नसल्यामुळे तो जसाच्या तसा मोठय़ा आतडय़ात जातो. तेथे तो पाण्यामुळे फुगतो. आकारमान वाढून तो मऊ होतो, हा मळ फुगल्यामुळे आतडय़ातून लवकर शरीराबाहेर टाकला जातो. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि आपल्या आहारातील हानीकारक पदार्थ चटकन शरीराबाहेर जातात. (उदा. कार्सिनोजन्स- कॅन्सरला कारणीभूत असलेले पदार्थ)
  • विद्राव्य फायबरमुळे अन्नातील काही घटक रक्तात शोषले जाण्याची क्रिया मंदावते. या घटकांमध्ये कोलेस्टेरॉलही अंतर्भूत आहे. शोषण सावकाश झाल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
  • विद्राव्य फायबरमुळे कबरेदक रक्तात शोषली जाण्याची क्रियाही मंदावते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी राहते.

भाज्यांच्या आणि फळांच्या साली (काही अपवाद सोडून) न काढता खाणे, कणीक मळताना ती न चाळता घेणे अशा मार्गानी आपण फायबर खाऊ शकतो. सॅलडमधून मोठय़ा प्रमाणात तंतू फायबर मिळू शकतात.

स्निग्ध पदार्थ आणि हृदयविकार

(फॅटस्):

स्निग्ध पदार्थ (फॅट्स) दोन प्रकारचे असतात. वनस्पतीजन्य आणि प्राणिजन्य.

स्निग्ध पदार्थाचे दोन प्रकार असतात.

१) मेदाम्ले

२) कोलेस्टेरॉल

मेदाम्ले तीन प्रकारची असतात.

१) संपृक्त ( Saturated Fatty Acids)

२) असंपृक्त (unsaturated)

  • म्युफा : Mono- unsaturated Fatty Acids
  • प्युफा : Poly- unsaturated Fatty Acids

३) अतिसंपृक्त (Trans Fatty Acids)

कोलेस्टेरॉल हा प्राणिजन्य खाद्यवस्तूंत असतो.

वेगवेगळी तेले, तूप, वनस्पती, लोणी हे सर्व स्निग्ध पदार्थ जवळजवळ १००% स्निग्धांशाचे असतात. फॅटी अ‍ॅसिड्स (स्निग्धाम्ल) म्हणजेच ट्रायग्लिसराइड्स आणि ग्लिसरॉल या पदार्थापासून हे स्निग्धांश बनलेले असतात. सर्व स्निग्ध पदार्थामध्ये संपृक्त आणि असंपृक्त अशी दोन्ही प्रकारची स्निग्धाम्ल असतात.

असंपृक्त स्निग्धांशामध्ये दोन प्रकारची स्निग्धाम्ल असतात. ‘ओलिक अ‍ॅसिड (Oleic Acid) असलेले मोनो- अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि लिनोलिक अ‍ॅसिड (Linoleic Acid) व अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड (Alpha- Linolenic Acid) ही पॉलिअन सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स असंपृक्त स्निग्धांशांमध्ये असतात.

संपृक्त स्निग्धांशांचे आहारातील प्रमाण अगदी कमी असावे, कारण त्यातूनच पुढे कोलेस्टेरॉल तयार होते. प्राणीज स्निग्धांश उदा. लोणी, तूप, अंडय़ातील बल्क हे मुख्यत: संपृक्त स्निग्धाम्लांचे बनलेले असतात. पाम तेल आणि खोबरेल तेल हे अपवाद वगळता बाकीचे वनस्पतीज स्निग्धांश म्हणजे शेंगदाणा तेल, करडई तेल, सूर्यफूल तेल मुख्यत: असंपृक्त स्निग्धाम्लानी बनलेले असतात. अर्थात या असंपृक्त स्निग्धाम्लामध्येही अगदी थोडय़ा प्रमाणात का होईना, पण थोडी संपृक्त स्निग्धाम्ल असतात. म्हणून हृदयविकार असणाऱ्या लोकांनी तेलाचा वापर अगदी कमी प्रमाणात करायला हवा.

आपण आपल्या रोजच्या जेवणातून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्निग्ध पदार्थ (फॅट्स) खात असतो. आपल्या शरीराला ऊर्जानिर्मितीसाठी तसेच शरीरक्रिया व्यवस्थित चालू राहण्यासाठी काही प्रमाणात स्निग्ध पदार्थाची जरुरी असते. स्निग्ध पदार्थाच्या प्रत्येक १ ग्रॅमपासून ९ उष्मांक मिळतात.

कोलेस्टेरॉल हा चरबीचा एक प्रकार आहे. तो शरीरातील सर्व पेशींमध्ये आणि रक्तात आढळतो. शरीरात तो प्रामुख्याने यकृतात तयार होतो.

कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेद्वारे त्याचे शोषण होऊन रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. तसेच सॅच्युरेटेड फॅट्सचे यकृतात कोलेस्टेरॉलमध्ये रूपांतर होते. त्यामुळे आहारात त्याचे प्रमाण वाढले की, रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.

याउलट जर अनसॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ आहारात असले तर कोलेस्टेरॉल आटोक्यात राहाते, कारण त्याचे रूपांतर कोलेस्टेरॉलमध्ये होत नाही व शरीराच्या व पेशींच्या वाढीसाठी व त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

तूप, लोणी, मांस, मासे, साय-मलाई या प्राणिजन्य पदार्थामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप अधिक असते. शाकाहारी पदार्थात ते नसते. याउलट भाजीपाला, फळे, धान्ये, कडधान्ये या वनस्पतीजन्य पदार्थामध्ये कोलेस्टेरॉल अजिबात नसते.

सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण प्राणिजन्य पदार्थात जास्त असते. उदा. दूध, तूप, लोणी, मांस, खोबरे, नारळाचे तेल, पाम तेल यामध्ये वनस्पतीजन्य असूनही सॅच्युरेटेड फॅट्स जास्त आहेत. इतर वनस्पतीजन्य तेलात हे फॅट्स कमी प्रमाणात असतात. संपूर्ण मेदाम्ल सॅच्युरेटेड फॅट्स ओळखण्याची सोपी चाचणी म्हण्जे थंड हवामानात किंवा फ्रिजमध्ये ते गोठतात. उदा. तूप, खोबऱ्याचे तेल.! याउलट म्युफा, प्युफा थंडीत थिजत नाही.

वनस्पती तूप (डालडासारखे पदार्थ) हे हायड्रोजनेशन नावाच्या प्रक्रियेने वनस्पती तेलांपासून तयार केले जाते. त्यामुळे या तेलांना घट्टपणा येतो आणि ते जास्त वेळ टिकून राहतात. या प्रक्रियेत वनस्पती तेलातील असंपृक्त मेदाम्लाचे संपृक्त मेदाम्लात रूपांतर होते. असे वनस्पती तूप हे जास्त हानिकारक ठरते.

असंपृक्त मेदाम्ले (Unsaturated Fatty Acids) हे मुख्यत: वनस्पतीजन्य पदार्थापासून मिळतात. माशांच्या तेलातसुद्धा ते असतात. म्युफा हे ऑलिव्ह ऑइल, तीळ, मोहरी, कॅनोला, राइस ब्रान यामध्ये जास्त असतात, तर प्युफा हे सूर्यफूल, मका, सरकी, सोयाबीन, करडी इत्यादी तेलांमध्ये असते.

अत्यावश्यक मेदाम्ले (Essential Fatty Acids), लिनोलिक (Linolic Acids), अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड (Alpha – Linolenic Acid), अ‍ॅरॉचिडोनिक अ‍ॅसिड ही प्युफा गटाची तीन मेदाम्ले शरीरातील महत्त्वाच्या कार्यासाठी आवश्यक असतात. ती शरीरात आवश्यक प्रमाणात तयार होत नाही म्हणून त्यांना आहारातून प्राप्त करणे आवश्यक असते. सोयाबीन तेल, गहू, बाजरी, काळे उडीद, राजमा, सोया, हिरव्या पालेभाज्या, मेथी, अक्रोड यामध्ये हे प्युफा भरपूर प्रमाणात आढळतात.

कोलेस्टेरॉल आणि फॅटी अ‍ॅसिड्स, मेदाम्लांची शरीराला आवश्यकता असते. व्हिटामिन्स अ, ऊ, ङ  यांना आतडय़ांत शोषण करण्यात मेदाम्लांची मदत लागते. मज्जासंस्थांची वाढ, दृष्टिपटलाची वाढ, हार्मोन्सची निर्मिती अशा बऱ्याच जीवनावश्यक घटकांसाठी मेदाम्लांची गरज असते; पण हेच कोलेस्टेरॉल आवश्यकतेपेक्षा अधिक वाढल्यास ते रक्तवाहिन्यांत साठून हृदयविकार, मेंदूविकार, रक्तवाहिन्यांचे विकार करतात म्हणून कोलेस्टेरॉलचे प्रमाण आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे असते.

निरोगी माणसाच्या आहारात संपृक्त मेदाम्ले, म्युफा, प्युफा या तिन्ही गटांची मेदाम्ले एकूण मेदाम्लाच्या प्रत्येकी एकतृतीयांश इतकी असावीत. दैनंदिन आहाराच्या एकूण उष्मांकापैकी १५ ते २० टक्केच उष्मांक एकूण मेदाम्लांचे असावेत.

आहारातील एकूण मेदाम्लांपैकी सुमारे १० ते १५ ग्रॅम मेदाम्ले दूध, दही (साय काढलेले) व सुमारे १५ ते २० ग्रॅम म्युफा व प्युफा एकत्रितपणे धान्ये, डाळी, कडधान्ये, तिन्ही गटांतील भाज्या, फळे यामधून अदृश्य स्वरूपात मिळतात. उरलेली मेदाम्ले तूप (संयुक्त) आणि खाद्यतेले (म्युफा आणि प्युफा) यामधून मिळवायची असतात. पुरेशी अत्यावश्यक मेदाम्ले पोटात जाण्यासाठी दैनंदिन आहारात दृश्य व अदृश्य मिळून म्युफा व प्युफा एकत्रितपणे कमीत कमी ३० ते ४० ग्रॅम असणे आवश्यक आहे. हे सर्व लक्षात घेऊन दैनंदिन आहारातील तेल व तुपाची मर्यादा ठरवावी. साधारणपणे २ ते ५ ग्रॅम तूप आणि ५ ते १० ग्रॅम तेल आहारात घेण्यास हरकत नाही. ज्यांना हृदयविकार आहे अशा रुग्णांनी हे प्रमाण आणखीनच कमी करावे.

योग्य प्रमाणात म्युफा आणि प्युफा मिळण्याच्या दृष्टीने कोणते तरी एकच तेल वापरण्यापेक्षा दोन प्रकारची तेले आपल्या आवडीनुसार एकत्रित करून किंवा आलटूनपालटून वापरावीत. साधारणत: सूर्यफुलाचे तेल, शेंगदाणा तेल, करडई, ऑलिव्ह ऑइल ही तेले आलटूनपालटून वापरावीत, जेणेकरून म्युफा, प्युफा व ओमेगा-३ यांचा समावेश व्हावा. भारतात सहज उपलब्ध अशी मोहरी, शेंगदाणा व सूर्यफूल या तीन तेलांच्या समभाग मिश्रणात म्युफा, प्युफा आणि कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्सचे संतुलन साध्य होते. कॅनोला तेलात प्युफामध्ये ओमेगा-३ चे प्रमाण भरपूर असते. सफोला तेलामध्ये ओमेगा-६ चे प्रमाण जास्त आहे, तर ओमेगा-३ व म्युफाचे प्रमाण थोडे कमी आहे. ओमेगा-६ ने वजन वाढू शकते आणि प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. ओमेगा-३ ते ओमेगा-६ चे प्रमाण ५:१ असे असावे. ओमेगा-३ वाढविण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, सालीसकट कडधान्ये, बीन्सचे प्रमाण आहारात वाढवावे.

दूध, दही, लोणी, तूप यांत संपृक्त फॅट असते. (saturated fat) ते शरीराला.. हृदयाला घातक असते. त्याचे प्रमाण कमीत कमी ठेवावे. (low fat) लो फॅट दूध किंवा स्किम्ड मिल्क यात फॅट अत्यंत कमी असते किंवा नसते. स्किम्ड मिल्क (skimmed milk) जास्तीत जास्त १५०-२०० मि.ली. वापरण्यास हरकत नाही.

मासे : माशांपासून निघणाऱ्या तेलात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड (स्निग्धाम्ल) असतात तशीच ती काही वनस्पतींमध्ये, धान्यांमध्ये आणि कडधान्यांमध्येही असतात.

मासे आणि इतर जलचरांमध्ये ओमेगा-३ असल्यामुळे हृदयविकार असणाऱ्यांनी मत्स्याहार करावा. तो उपयुक्त असतो, असा समज बऱ्याच प्रमाणात प्रचलित आहे. हे काही सर्वस्वी बरोबर नाही, कारण ओमेगा-३ बरोबरच माशांमध्ये संपृक्त स्निग्धाम्ल ही असतात, शिवाय मासे कच्चे किंवा रोस्टेड खाल्ले तरच ओमेगा-३ चा फायदा.. तळून खाल्ले किंवा करी करून त्यात खूप तेल असेल, खोबरे असेल, तर अशा माशांच्या डिशमध्ये संपृक्त स्निग्धाम्ल (Saturated Fatty Acid) चे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढून हृदयास हानिकारक होते.

एक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या प्रबंधानुसार- अभ्यासानुसार हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या आणि एका आठवडय़ात दोन-तीन वेळा मत्स्याहार करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण २९ टक्क्यांनी घटलेले आढळले. त्यामुळे थोडा मत्स्याहार अधूनमधून करण्यास हरकत नाही, पण रोज मत्स्याहार करणे मात्र हितावह नाही.

डॉ. गजानन रत्नपारखी – response.lokprabha@expressindia.com