नागपूर पोलिसांचा प्रस्ताव, नासुप्रसोबतही चर्चा

पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार आता नागपूर पोलिसांनीही स्वस्तात मालकी हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले असून बेसा बेलतरोडी या परिसरात पोलिसांच्या घरासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचारी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहतात. ब्रिटिश काळातील १८० चौरस फुटाच्या जागेतील निवासी संकुलात त्यांचे अख्खे कुटुंब राहते.

याची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी नियमात बदल करून पोलिसांकरिता ५०० चौरस फुटाचे दोन बेडरूम, किचन, हॉलचे निवासी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला असून नागपुरात तसे २८० फ्लॅट तयार करण्यात येणार आहे. त्याशिवाय सेवानिवृत्तीनंतर पोलिसांकडे स्वत:च्या मालकीचे घर नसते. हे घर त्यांना उपलब्ध व्हावे म्हणून पंतप्रधान आवास योजना आणि इतर योजनांमधून पोलिसांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी एक योजना तयार करून पोलिसांकरिता मालकी हक्काची घरे देण्याच्या दृष्टीने सुरुवात झाली आहे. नागपुरातील कर्मचाऱ्यांनाही मालकी हक्काची घरे देण्यात येणार असून त्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पोलीस मुख्यालयाचे तत्कालीन पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासतर्फे लोकांसाठी घरे बांधण्यात येतात.

त्यामुळे त्या इमारतींमध्ये पोलिसांकरिताही काही घरे राखीव असावीत आणि त्यांनाही स्वस्त दरात घर मिळावे, यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती आहे.

नागपूर शहरात साडेआठ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. मात्र, त्यांच्याकरिता केवळ साडेतीन हजार शासकीय निवासी संकुल आहेत.

त्यामुळे पोलिसांना अतिरिक्त शासकीय निवासी संकुलासोबत मालकी हक्काची घरे मिळाल्यास त्यांच्या राहण्याचा प्रश्न मिटेल आणि ते अधिक चांगल्याप्रकारे सेवा देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रस्ताव अंतिम टप्प्यात

बेसा बेलतरोडी परिसरात पोलिसांकरिता मालकी हक्काची घरे बांधण्याचा आणि ते स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. प्रस्ताव लवकरच शासनाला पाठविण्यात येईल आणि मंजुरी प्राप्त होताच कामाला सुरुवात होईल. या सर्व बाबींवर लोहमार्ग पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे लक्ष ठेवून आहेत. याशिवाय नासुप्रसोबतही पोलिसांना घरे मिळण्यासाठी चर्चा सुरू आहे. यातून सकारात्मक मार्ग निघेल.

डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त