हवा प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ७० लाख लोक तर महाराष्ट्रात १.८ लाख लोक बळी पडतात. येणाऱ्या काळात हवा प्रदूषणाचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवा प्रदूषण आणि तापमानवाढ हे जगापुढील मोठे आव्हान असणार आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटना व ‘लँन्सेट हेल्थ जर्नल’च्या अभ्यासात देण्यात आला आहे.

तापमानवाढीत हवा प्रदूषण हे भर घालत असते आणि जगभरात सर्वाधिक प्रदूषित शहरे भारतात आहेत. राष्ट्रीय वायु गुणवत्ता मानकांची लक्ष्य गाठता न येणाऱ्या शहरांची संख्या भारतात १०२ इतकी आहे. हवा प्रदूषणात देशभरात महाराष्ट्र आग्र स्थानावर आहे. एकटय़ा महाराष्ट्रात १८ शहरे  पर्यावरणीय आरोग्याच्या बाबतीत जीवनरक्षण प्रणालीवर (व्हेंटिलेटर) आहेत. हवा प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात आणून ते कमी करण्यासाठी पहिल्यांदाच जगभरात ‘निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन’   साजरा करण्यात येत आहे. या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त महाराष्ट्रात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या वातावरण फाऊंडेशनच्यावतीने ‘साफ श्वास २४ तास’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमासाठी मराठी अभिनेते देखील समोर आले असून भारत गणेशपुरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे. भविष्यात येणाऱ्या पिढीला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर गरजेचे बनू नये, याअनुषंगाने गणेशपुरे यांचे आवाहन येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, हवा प्रदूषणाचा लहान मुलांच्या फुफ्फुसावर आणि एकंदरीतच त्यांच्या आरोग्यावर सर्वाधिक दुष्परिणाम होत असतो. भविष्यात ही बाब टाळण्यासाठी हरित ठिकाणांचे संवर्धन व प्रदूषणावर नियंत्रण हा मूलमंत्र सर्वानी अंगीकारला पाहिजे.

हवा प्रदूषणाचा गंभीर धोका ओळखून योग्य ती पावले उचलावी लागतील. यावर वेळीच उपाय केले नाही तर येणाऱ्या पिढीला श्वास घेण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. या पिढीच्या भविष्यासाठी स्वच्छ हवेचा वसा आपल्याला जपून ठेवावा लागेल. स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे.

– भारत गणेशपुरे, अभिनेता