‘पृथ्वीसाठी एक तास’ उपक्रम आज

डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाच्यावतीने जगभरात ‘पृथ्वीसाठी एक तास’ हा उपक्रम राबवून वीज बचतीचे आवाहन केले जाते. या अंतर्गत उपराजधानीने वीज बचतीत आघाडी घेतली असून गेल्या पाच वर्षांत तब्बल एक लाख ६० हजार युनिट वीजबचत केली आहे. उद्या, शनिवारी साजरा होणाऱ्या पृथ्वीसाठी एक तास या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आली आहे.

पृथ्वीसाठी एक तास हा उपक्रम सात हजार शहर आणि १८० देशात साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम यंदा स्वच्छ हवा, स्वच्छ जल आणि स्वच्छ अन्नासाठी राबवला जात आहे. प्रदूषणामुळे हवेसोबतच पाणी आणि अन्नही दूषित झाले आहे. ते थांबवण्याची गरज आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाच्या वतीने पृथ्वीसाठी एक तास या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरच्या शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत वीजदिवे बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते. जगभरात लोक याला प्रतिसाद देतात. याच उपक्रमाला अनुसरून नागपुरात माजी महापौर अनिल सोले यांनी प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला एक तास वीज बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले. महापालिकेने ग्रीन विजिल फाऊंडेशनच्या सहकार्याने २०१४ पासून हा उपक्रम नागपुरात राबवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत दर पौर्णिमेला शहरात २२०० ते २७०० युनिट वीज बचत केली जाते. एक युनिट वीज तयार करण्यासाठी ५०० ग्रॅम कोळसा, साडेसात लीटर पाणी लागते, तर एक युनिट विजेच्या निर्मितीत एक किलो कार्बन उत्सर्जन होते. उपराजधानीत एक लाख ६० हजार युनिट वीज बचत झाली आहे.

इटर्निटी मॉलमधून वीजबचतीचा संदेश देणार

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताने २०१६ मध्ये  पॅरिस करारावर स्वाक्षरी केली. मात्र, त्याआधीपासूनच नागपुरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सुरुवात झाली आहे. पृथ्वीसाठी एक तास वीजदिवे बंद करण्याचा संदेश डब्ल्यूडब्ल्यूएफच्यावतीने दिला जातो. नागपुरातही उद्या, शनिवारी ग्रीन विजिलच्यावतीने इटर्निटी मॉलमध्ये रात्री ८.३० ते ९.३० पर्यंत वीज दिवे मंद करून वीजबचतीचा संदेश दिला जाणार आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक कल्याणी वैद्य यांनी दिली.