नागपूर : कृषिमालाच्या वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार किसान रेल्वेने वाहतूक करणाऱ्यांना वाहतूक भाड्यात ५० टक्के सवलत देत आहे. त्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय रेल्वेकडे १० कोटी जमा करण्यात आले आहेत.
करोनाची झळ इतर क्षेत्रांप्रमाणे कृषी क्षेत्रालादेखील पोहोचली आहे. या क्षेत्राला आधार देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगाने खराब होणारी २२ फळे, भाजीपाला आणि कृषिमालाचा समावेश केला आहे. यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेकडे १० कोटी जमा केले आहेत. हा निधी संपल्यावर अतिरिक्त निधी पुरवण्यात येणार आहे, असा तपशील माहिती अधिकारात प्राप्त झाला आहे.
भाजीपाला व फळपिकांच्या साठवण व वाहतुकीला अनुदान देणारी ही योजना आहे. शेतकरी व प्रक्रिया उद्योगांना निवडक शेतीमालाची साठवणूक व वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा मुख्य हेतू या योजनेमागे आहे. रेल्वे बोर्डाने यासंदर्भातील आदेश १३ ऑक्टोबरला काढले. त्यानंतर पहिली किसान रेल्वे १४ ऑक्टोबरला धावली. किसान रेल्वेने ३१ डिसेंबरपर्यंत ६१७९.२ टन माल वाहतूक झाली. या योजनेत टोमॅटो, कांदे आणि बटाटे तसेच आंबा, केळी, पेरू, किवी, लिची, पपई, संत्री, अननस, डाळिंब, फणस तसेच चवळीच्या शेंगा, वांगी, ढोबळी मिरची, गाजर, कोबी, हिरवी मिरची, भेंडीला अनुदान मिळत आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दिल्ली आणि पश्चिम बंगालला संत्रीपुरवठा केला. किसान रेल्वेच्या माध्यमातून नागपूर विभागाला संत्री वाहतुकीतून १.९९ कोटी रुपये मिळाले, असा तपशील माहिती अधिकार कार्यकर्ता अभय कोलारकर यांना प्राप्त झाला आहे. याशिवाय दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेनेदेखील भाजीपाला आणि फळांची वाहतूक केली. करोनाच्या काळात आर्थिक अडचणीत असलेल्या रेल्वेला यातून थोडा दिलासा मिळाला आहे.
किसान रेल्वेने ६१७९.२ टन माल वाहतूक
किसान रेल्वेच्या माध्यमातून मध्य रेल्वेने १४ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर २०२० या कालावधीत ६१७९.२ टन माल वाहतूक केली. यामध्ये भाजीपाला आणि फळांचा समावेश आहे. केवळ संत्री वाहतुकीतून रेल्वेला डिसेंबरपर्यंत १ कोटी ९९ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 12:00 am