महापालिकेचा निर्णय

नागपूर : वातावरणातील बदलानंतर उद्भवणाऱ्या आजारामुळे नागरिक धास्तावले आहेत. याची दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने महापालिकेतर्फे दहाही झोनमध्ये ‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे नि:शुल्क तपासणी व उपचार केले जाणार आहे.

वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याने अनेक जण त्रस्त आहेत. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर अशी लक्षणे दिसल्याने लोकांमध्ये भीती आहे. त्यामुळे अशा किरकोळ आजारांच्या तपासणी व उपचारासाठी प्रत्येक झोनमध्ये एक याप्रमाणे शहरात १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू केले आहेत. संबंधित झोनमधील महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ते सुरू झाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धरमपेठ झोनमधील के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान नगर झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धंतोली झोनमधील नरसाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरूनगर झोनमधील नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनमधील मोमीनपुरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनमधील पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आशीनगर झोनमधील कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनमधील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हे‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आले.

या क्लिनिकमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेमध्ये एक डॉक्टर, परिचारिका, फॉर्मसिस्ट, पॅथॉलॉजिस्ट सेवा देतील. आवश्यकता असल्यास रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले जातील, आवश्यक औषधेही देण्यात येतील. याशिवाय तीव्र स्वरूपाचा ताप व अन्य लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णाला पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येईल. या नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये तपासणी करायची असेल त्यांना महापालिकाद्वारे नोंदणीकृत खासगी रुग्णालय व रुग्णालयांमध्ये तपासणी करता येईल. यासंबंधी महापालिकेद्वारे सर्व खासगी रुग्णालयांना सेवा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.