महापालिका निवडणूक लढविणाऱ्यांना त्यांच्या खर्चाचा लेखाजोखा सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपली असून आतापर्यंत एकूण उमेदवारांपैकी केवळ सरासरी दहा टक्के उमेदवारांनीच खर्चाचा तपशील सादर केला आहे.

महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत उमेदवारांकडून होणारा खर्च बघता त्यावर नियंत्रण असावे, यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना १० लाख रुपये खर्च मर्यादा ठरवून दिली होती. महापालिकेच्या १५१ जागांसाठी ३८ प्रभागांमध्ये एकूण १ हजार १३५ उमेदवार मैदानात होते.

त्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत खर्चाचा तपशील सादर करणे बंदनकारक करण्यात आले होते. आतापर्यंत १० टक्क्यांवर म्हणजे १४६ उमेदवारांनी तो सादर केला. खर्च सादर न करणाऱ्यांमध्ये भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा या राजकीय पक्षाच्या उमेदवारंचा समावेश आहे.

निवडणुकीत उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणात खर्च केला असला तरी प्रत्यक्षात कागदावर मात्र तो मर्यादित स्वरूपाचा असतो. दोन आठवडय़ापूर्वी झालेल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत त्या संदर्भात सूचना देण्यात आली होती.

मात्र प्रत्यक्षात पक्षाच्या अनेक सदस्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते. दरम्यान, उमेदवारांनी सादर केलेला खर्च नियमानुसार आहे किंवा नाही, याची तपसणी आयोगाकडून केली जाणार होती, तो कमी दाखविला असेल तर संबंधितांवर कारवाई करण्याची नियमात तरतूद आहे.

मात्र याबाबत महापालिकेच्या निवडणूक शाखेकडे माहिती नाही. उमेदवाराच्या प्रभागात जाहीर सभा होत असेल तर तो खर्च सुद्धा संबंधित उमेदवाराच्या नावावर दाखविण्यात येणार होता.

अनेकांनी सभेचा खर्च लेखाजोखामध्ये दाखविला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निवडणूक लढविणाऱ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसात म्हणजे २८ मार्चपर्यंत लेखाजोखा सादर करणे अपेक्षित होते. १४६ उमेदवारांनी आतापर्यंत तपशील दिला. उर्वरितांनी का सादर केला नाही ते बघावे लागेल. त्यानंतर निवडणूक प्रमुख त्यावर निर्णय घेतील.

महेश धामेचा, सहआयुक्त, महापालिका निवडणूक विभाग