डॉ. जब्बार पटेल, मोहन जोशी नाव मागे न घेण्यावर ठाम

नागपूर : अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्यावतीने आयोजित शतकमहोत्सवी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या निमित्ताने समांतर व व्यावसायिक रंगभूमीचे समर्थक समोरासमोर आले असून हे दोन्ही दावेदार नाव मागे न घेण्यावर ठाम असल्यामुळे यावेळी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ आहे.

यावर्षी  ऐतिहासिक शतकमहोत्सवी नाटय़ संमेलन असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. डॉ. जब्बार पटेल आणि नाटय़ परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेत नियामक मंडळात एकूण ६० सदस्य आहेत. त्यातील चित्रपट अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनी सहा महिन्यांपूर्वी राजीनामा दिला आणि तो नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र गेल्या सहा महिन्यांत कोल्हे यांच्या जागेवर कोणाचीही निवड करण्यात आली नाही. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले नाही तर संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी केवळ नियामक मंडळाच्या ६० सदस्यांना  मतदान करण्याचा अधिकार आहे. नियामक मंडळामध्ये दोन गट असून त्यातील अर्धे सदस्य मोहन जोशी यांच्या तर अर्धे जब्बार पटेल यांच्या बाजूने असल्याचे कळते. शिवाय मध्यवर्ती शाखेत चार घटक संस्था असून त्यात कलाकार संघ, निर्माता संघ, कामगार संघ व बालरंगभूमी परिषद यांचा समावेश आहे. या घटक संस्थांना मतदानाचा अधिकार आहे का, यावरून सध्या नियामक मंडळात चर्चा सुरू आहे. घटक संस्थांना मतदानाचा अधिकार असेल आणि निवडणूक झाली तर या घटक संस्था कोणाकडे जातील, याबाबत नाटय़वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सध्या ५९ सदस्य असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५९ सदस्यांपैकी एका गटातील ३० सदस्यांचा जब्बार पटेल यांना तर दुसऱ्या गटातील २९ सदस्यांचा मोहन जोशी यांना पाठिंबा आहे. त्यामुळे निवडणूक झाली तर ती अटीतटीची होणार हे स्पष्ट आहे.

* नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ३०आक्टोबपर्यंत प्रस्ताव पाठवण्याबाबत सर्व शाखांना सूचना करण्यात आली होती. त्यात काहींनी जब्बार पटेल तर काहींनी मोहन जोशी यांच्या नावाची शिफारस केली. विशेष म्हणजे, नागपूरच्या नाटय़ परिषद शाखा व महानगर शाखेने जब्बार पटेल यांच्या नावाची शिफारस केली आहे.

संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल व मोहन जोशी यांचे अर्ज आले असून कुणीही नाव मागे घेतलेले नाही. नियामक मंडळाच्या बैठकीत दोन्ही नावांवर चर्चा होईल आणि त्यानंतर बहुमताने निवड करायची की निवडणूक घ्यावी लागेल, याबाबतचा  निर्णय निवडणूक अधिकारी घेतील. मात्र सध्या याबाबत कुठलीच चर्चा नाही.

– प्रसाद कांबळी अध्यक्ष, अ.भा. मराठी नाटय़ परिषद, मध्यवर्ती शाखा.