मृत्यूसंख्या ४०० च्या उंबरठय़ावर; आरोग्य विभागाची चिंता वाढली

नागपूर : येथील शहरी आणि ग्रामीण भागात गेल्या २४ तासात नवीन १,०२४ बधितांची भर पडली असून ३७ नवीन मृत्यू नोंदवण्यात आले आहे. नवीन मृत्यूत शहरातील ३० मृत्यू असल्याने येथील बळींची संख्या ४०० च्या उंबरठय़ावर पोहचल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

गेल्या २४ तासांत मेयो रुग्णालयात १२ मृत्यू नोंदवण्यात आले. त्यात लाकडी पूल (महाल) येथील ६२ वर्षीय महिला, जरीपटका येथील ७३ वर्षीय पुरुष, बांगलादेश येथील ६६ वर्षीय महिला, मिनी माता नगर (पारडी) येथील ५० वर्षीय महिला, कामठीतील ७५ वर्षीय पुरुष, पवार नगर (हुडकेश्वर रोड) येथील ७९ वर्षीय पुरुष, ताजबाग येथील ४९ वर्षीय महिला, चिखली येथील ५७ वर्षीय पुरुष, मोहन नगर येथील ६७ वर्षीय पुरुष, पचपावली येथील ६५ वर्षीय पुरुष, नंदनवन येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तर २४ तासात मेडिकलसह खासगी रुग्णालयातही अनेक मृत्यू नोंदवण्यात आले. दगावलेल्या ३८ लोकांमध्ये शहरातील ३०, ग्रामीणचे ४ आणि जिल्ह्य़ाबाहेरचे नागपूरला उपचाराला आलेल्या ३ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत नागपुरात दगावलेल्या एकूण बधितांची संख्या थेट ५४९ वर पोहचली आहे. त्यात शहरातील ३९५, ग्रामीणच्या ८८, जिल्ह्याबाहेरच्या ६६ जणांचा समावेश आहे. तर शहरात २४ तासांत नवीन ९०३ आणि ग्रामीण भागात १२१ बाधित असे एकूण १,०२४ रुग्ण वाढल्याने येथील आजपर्यंतच्या बधितांची संख्या थेट १५,६४१ वर पोहचली आहे. पैकी ११,६१३ रुग्ण नागपूर शहरातील तर ४,०२४ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

५,३०७ बाधित गृहविलगीकरणात

येथील शहरी आणि ग्रामीण भागात तब्बल ५,३०७ बधितांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. पैकी सर्वाधिक रुग्ण शहरी भागातील आहेत, तर मेडिकल, मेयो, एम्ससह शहरातील शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांसह कोविड केयर सेंटरमध्ये बऱ्याच जोखमेतील अथवा गंभीर गटातील बधितांवर उपचार सुरू आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७,८९६ वर पोहचली आहे. पैकी १,०२४ जणांवर उपचाराची प्रक्रिया सुरू व्हायची होती.

करोनामुक्तांची संख्या ७,१९६ वर

येथील शहरी भागात २४ तासात ६१ तर ग्रामीण भागात २२० असे एकूण २८१ जण करोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या थेट ७,१९६ वर पोहचली आहे. त्यात शहरातील ४,५७७ तर ग्रामीणच्या २,६१९ जणांचा समावेश आहे.

पशुचिकित्सालयात करोनाचा शिरकाव

नागपूर :  आता प्राण्यांवर उपचार करणाऱ्या पशुचिकित्सालयातही करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पशुवैद्यक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पशुचिकित्सालयातील सफाई कर्मचारी बाधित झाल्याने तातडीने आवश्यक ती पावले उचलण्यात आली. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाअंतर्गत येणाऱ्या पशुचिकित्सालयातील एक सफाई कर्मचारी व त्याचे कु टुंबीय बाधित झाले आहेत. त्यामुळे पशुचिकित्सालय सुरू ठेवायचे की बंद यावर बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरणामुळे लोक आजारी पडत असताना प्राण्यांनाही काही ना काही आजार सुरू आहेत. माणसांसाठी अनेक रुग्णालये असले तरी प्राण्यांसाठी मोजके च रुग्णालय शहरात आहेत. त्यापैकी या पशुचिकित्सालयात प्राण्यांवर उपचार करणारे अनेक तज्ज्ञ पशुवैद्यक आहेत. मात्र, इतर कर्मचारी व अधिकारी बाधित झाले तर काय, हा प्रश्न देखील कायम आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याची मागणीही या बैठकीतून समोर आली. दरम्यान, तातडीने रुग्णालयाचे र्निजतुकीकरण करण्यात आले.