महामंडळाची ३ हजार कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुटी, प्रत्येक वाहक-चालकाची बसस्थानकांवर तपासणी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या वतीने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत होळीच्या पाश्र्वभूमीवर रोज धावणाऱ्या १,६०० पैकी १,१२० बसेस धूलिवंदनात (२३ मार्च) रस्त्यांवर धावणार नाही. होळीत अचानक मद्यपींची संख्या वाढत असल्याने रस्त्यांवर वाढणारे उपद्रव आणि प्रवाशांची रोडावणारी संख्या बघता हा निर्णय झाला आहे. रोजच्या ९ हजारपैकी ७५ टक्के फेऱ्या कमी झाल्याने सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुटी देण्यात आली आहे, तर बसचालक, वाहकावर त्यांनी व्यसन केले काय म्हणून बसस्थानकावरील नियंत्रक नजर ठेवणार आहेत.
चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वसामान्यांच्या प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून ‘एसटी’कडेच बघितले जाते. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्य़ांत रोज एसटीच्या १ हजार ६०० बसेस धावतात. यातून रोज पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्य़ांत ९ हजार फेऱ्यांमध्ये हजारो प्रवासी प्रवास करतात. होळीच्या दिवशी विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्य़ांत रस्त्यांवर दारूच्या नशेत उपद्रव करणाऱ्यांची संख्या वाढते. बरेच वाहन-चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्यानेही अपघात वाढतात.
रस्त्यावरील संभाव्य धोका बघत या दिवशी नागरिकही प्रवास करणे टाळतात. प्रवासी नसण्यासह रस्त्यांवरील वाढणारे अपघात बघत एसटी महामंडळाने पूर्व विभागांतर्गत असलेल्या सहा जिल्ह्य़ांत ७० ते ७५ टक्के बसफेऱ्या या दिवशी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ ४८० च्या जवळपास बसेस रस्त्यांवर असणार आहे. त्यामुळे या दिवशी तब्बल ३ हजार कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रजा मिळणार असल्याने ते आपल्या घरी सुखाने होळी साजरी करू शकणार आहे. त्यातच या दिवशी विदर्भात काही नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर मद्यप्राशन केले जात असल्याने प्रत्येक बसचालक, वाहकावरही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची नजर रोखली जाणार आहे.
त्याअंतर्गत प्रत्येक बसस्थानकावरील नियंत्रक या दोन्ही कर्मचाऱ्यांची विविध कामांच्या दरम्यान तपासणी करणार आहे. त्यातून कोणी नशेत असल्यास त्याला बाजूला सारून इतरांकडे ही जबाबदारी देऊन या दोषी कर्मचारीवर कारवाईही केली जाईल. नागपूर विभागांतर्गत असलेल्या सहा जिल्ह्य़ांत ५० मोठे बस डेपो, ५० बसस्थानकांवर हा प्रकार होणार आहे. या दिवशी लहान पल्ल्याच्या फेऱ्या जवळपास रद्द होणार असून लांब पल्यांच्या फेऱ्यांनाच प्राथमिकता दिली जाणार आहे. होळीकरीता एसटी महामंडळाने एकही अपघात न केलेला व दारूच्या नशेत कधीही न आढळलेल्या कर्मचाऱ्यांनाच २३ मार्चला सेवेवर ठेवले आहे, हे विशेष.

पूर्व विदर्भातील २३ मार्चची स्थिती
………………..
जिल्हा रद्द फेऱ्या (टक्यात)
………………..
नागपूर           ७२
भंडारा             ८०
गोंदिया          ८२
चंद्रपूर           ६०
गडचिरोली    ६५
वर्धा              ७०