करोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊ न दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू  राहतील. यातही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेत केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनच्या सहकार्याने शहरातील विविध भागांतील १२ औषध दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अत्यावश्यक सेवांमध्ये किराणा, भाजीपाला, दूध, औषध दुकाने आदींचा समावेश आहे. या वस्तूंची दुकाने शहरात सुरू राहतील. मात्र नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. औषध पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असून गरजू व्यक्तींना २४ तास औषध मिळावे, या हेतूने मोजके मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याबाबत मुंढे यांनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत १२ मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य मेडिकल स्टोर्स दिवसा नियमित वेळेत सुरू असतील.

दुकानांची नावे

रामदासपेठेतील जैन मेडिकल, प्रिन्स मेडिकोज, गेटवेल हॉस्पिटल धंतोली येथील गेटवेल फार्मसी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील ड्रग स्टोर्स, मेडिकल चौकातील हार्दिक मेडिकल, धंतोली पोलीस ठाण्यामागील न्यूरॉन फार्मसी, सीआयआयएमएस हॉस्पिटल येथील सीआयआयएमएस फार्मसी, कस्तुरचंद पार्कजवळील किंग्जवे हॉस्पिटल येथील किंग्जवे फार्मसी, टेलिफोन एक्सचेंज चौकातील न्यू एरा हॉस्पिटलची न्यू एरा फार्मसी, सेवन स्टार हॉस्पिटल नंदनवन येथील सेवन स्टार फार्मसी आणि नॉर्थ अंबाझरी मार्गावरील वोक्हार्ट हॉस्पिटलची वोक्हार्ट फार्मसी ही दुकाने २४ तास सुरू राहतील.