एकूण ६३ पैकी ३८ मृत्यू केवळ २२ दिवसांतील

नागपूर : शहर व ग्रामीण भागात दिवसभरात करोनाने तीन बळी घेतले असून नवीन १२२ बाधितांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शहरात मृत्यू वाढत असल्याने आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या थेट ६३ वर पोहचली आहे.

मेडिकलमध्ये दगावलेला धंतोली परिसरातील वृद्धाला पाच दिवसांपासून श्वास घेण्यासह सर्दी, खोकला, ताप  होता.  त्यांना २० जुलैला मेडिकलच्या कोविड रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांना मधुमेह होता. शिवाय त्यांच्यावर मार्च-२०२० मध्ये ‘की’ प्रत्यारोपणाचीही शस्त्रक्रिया झाली होती. २२ जुलैच्या पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मेयोतही कामठीच्या ५४ वर्षीय महिलेसह ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू नोंदवला गेला. महिलेला २१ जुलैला तर पुरुषाला २० जुलैला दाखल करण्यात आले होते. या सर्व मृत्यूंमुळे आजपर्यंतच्या शहरातील विविध रुग्णालयांत नोंदवलेल्या करोनाच्या मृत्यूंची संख्या ६३ वर पोहचली आहे. १ जुलै ते २२ जुलैपर्यंतच्या कालावधीत तब्बल ३८ मृत्यू झाले आहेत. बुधवारी दिवसभरात नवीन १२२ बाधितांची भर पडल्याने आजपर्यंतच्या बाधितांची संख्याही आता थेट ३,२९३ वर पोहचली आहे.

दिवसभरात १३२ जण करोनामुक्त

मेडिकल, मेयो, एम्ससह इतर रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमधून बुधवारी दिवसभरात १३२ जण करोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे  करोनामुक्तांची एकूण संख्या २,११३ वर पोहचली आहे. शहरात आजपर्यंत आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्यांचे प्रमाण ६४.१६ टक्के आहे.

कारागृहाच्या कोविड केअर सेंटरमध्ये ६० सक्रिय रुग्ण

मध्यवर्ती कारागृहात कैदी, अधिकारी,  कर्मचारी असे मिळून एकूण ३११ हून अधिक बाधित आढळले होते. कैद्यांवर उपचारासाठी मध्यवर्ती कारागृहात प्रशासनाने कोविड केअर सेंटर उभारले आहे. येथे सुमारे दोनशे जणांवर उपचार सुरू केला. यापैकी १४५ जण करोनामुक्त झाले असून सध्या येथे ६० जणांवर उपचार सुरू आहेत. येथील सक्रिय रुग्णांसह मेयोत २५५, मेडिकल २७६, एम्स ५०, कामठी १८, खासगी रुग्णालय ३२, आमदार निवासातील कोविड केअर सेंटर ३४१ आणि दाखल होण्याच्या मार्गावरील ८६ असे शहरात एकूण १,११९ सक्रिय रुग्ण  आहेत.

रेल्वे सुरक्षा दलाचे १३ जवान करोनाग्रस्त

रेल्वेस्थानक आणि रेल्वेगाडय़ांमधील प्रवाशांना सुरक्षा देणारे रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपुरातील १३ जवानांना करोना झाल्याने रेल्वे प्रशासनाने दक्षतेचे निर्देश दिले आहेत. गेल्या दोन महिन्यात १३ आरपीएफ जवानांना करोना झाला आहे. त्यापैकी ८ जण बरे झाले असून ५ जवानांवर उपचार सुरू आहे.  या रुग्णांच्या संपर्कातील इतर जवानांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यांचा दैनंदिन अहवाल रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने गोळा करण्यात येत आहे. यातील बहुतांश रुग्ण रेल्वे सुरक्षा दलाच्या राखीव दलातील आहेत, असे मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी सांगितले.

रक्तद्रव्य उपचाराबाबत सावध राहा – गृहमंत्री

करोना रुग्णांसाठी उपयोगी ठरत असलेल्या रक्तद्रव्य उपचारावरून जनतेची फसवणूक होत असल्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकाराबाबत जनतेनी सावध राहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. काही रुग्णालयांनी ‘प्लाझ्मा बँक व प्लाझ्मा डोनेशन’ मोहीम सुरू केली आहे. या सुविधेचा काही जण गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. यासाठी बनावट प्रमाणपत्र देखील तयार केले जात आहेत. सायबर गुन्हेगार यासाठी समाजमाध्यमांवर विविध पातळीवर काम करीत आहे. रक्तद्रव्यदाता ऑनलाईन शोधतानाही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात कोणालाही तक्रार करावयाची असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर क्राईम.गव्ह.इन या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन अनिल देशमुख यांनी केले आहे.

या भागात आढळले बाधित

भारतनगर ३, धंतोली  ७, हनुमाननगर १, झिंगाबाई टाकळी १, काटोल रोड  ३, हंसापुरी १, सहयोगनगर १, समतानगर १, जागृतीनगर १, गोरेवाडा २, राजीवनगर (अजनी चौक) ४, शांतीनगर २, स्मॉल फॅक्ट्री १, काचीपुरा १, कडबी चौक १, विदर्भ हाऊसिंग बोर्ड १, निर्मल नगरी (नंदनवन) १, म्हाळगीनगर १, तिलकनगर १, रामकृष्ण नगर (दिघोरी) १, मोहन नगर १, नरेंद्र नगर १, गंगाबाई घाट १, तिननल चौक १, भानखेडा २, तीन खंबा १, गणेशपेठ १, शताब्दीनगर १, शिवाजीनगर १, प्रगतीनगर १, मानकापूर १, लाल लक्ष्मी अपार्टमेंट (धरमपेठ) १, हिंगणा रोड १, सूर्यानगर १, शताब्दीनगर १, कपिलनगर (नारी रोड) १, पुष्पांजली अपार्टमेंट (रेशीमबाग) ३, गुलशननगर १ आणि इतरही भागात बाधित आढळले.