आव्हान पूर्ण करताना गळफास घेतला

नागपूर : पब्जी या ऑनलाईन व्हिडीओ खेळात पुढील पातळी गाठण्यासाठी देण्यात आलेले आव्हान पूर्ण करताना पोलीस शिपायाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत योगेंद्रनगर परिसरात उघडकीस आली. राजवीर नरेंद्र ठाकूर (१३), नर्मदा अपार्टमेंट, योगेंद्रनगर असे मृत मुलाचे नाव आहे.

त्याचे वडील नरेंद्र अवधेशसिंह ठाकूर (३८) हे नागपूर पोलीस दलात शिपाई असून सध्या ते गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.  राजवीर हा सहाव्या वर्गात शिकत होता व अभ्यासात हुशार होता.  टाळेबंदीमुळे शाळेला सुटी असल्याने तो घरीच होता. काही दिवसांपूर्वी शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले. त्याकरिता वडिलांनी त्याला मोबाईल व टॅब विकत घेऊन दिला. अभ्यास संपल्यानंतर तो त्यावर  व्हिडीओ गेम खेळायचा. रविवारी रात्री उशिरापर्यंत तो  गेम खेळत होता. सोमवारी सकाळी  नरेंद्र  यांना मुलगा निपचित पडलेला दिसला. त्याच्या डोक्यात उशीची पिशवी होती. गळ्यात ओढणीने तयार केलेला फास होता व तो खिडकीला बांधलेला होता. नरेंद्र यांनी आपल्या भावाला बोलावून त्याला एलेक्सिस रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.  मोबाईल व टॅबवरून असे दिसते की तो पब्जी खेळत होता. त्यातील पुढील पायरी गाठण्यासाठीचे आव्हान पूर्ण करण्यासाठी त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय नरेंद्र ठाकूर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नोंदवला आहे.

समोशासाठी ११ वर्षांच्या मुलाकडून गळफास 

समोसा न मिळाल्याने एका ११ वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटनाही गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत रविवारी रात्री  उघडकीस आली. वीरू नत्थू शाहू रा. गंगानगर, काटोल रोड असे मृताचे नाव आहे. तो पाचव्या वर्गात शिकत होता.  त्याचे आईवडील भाजीपाला विक्री करतात. रविवारी आईने  मोठय़ा भावाला काही पैसे दिले. यातून त्याने समोसा विकत घेतला व घरी येऊन खाल्ला. यावेळी वीरूही भाऊ व आईकडे समोशाकरिता पैशांची मागणी करीत होता. त्याला कुणीही पैसे दिले नाही. या रागात त्याने स्वयंपाकघरात आईच्या साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई स्वयंपाक घरात गेली असता वीरू  गळफास घेतलेला दिसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.