न्यायालयाच्या दणक्यानंतर कारवाई; रामदासपेठ, उमरेड मार्गावर तणावाची स्थिती

नागपूर : न्यायालयाच्या दणक्यानंतर खळबळून जागे झालेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी सकाळपासून शहरातील १५ धार्मिक स्थळावर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाई केली. रामदासपेठ आणि उमरेड मार्गावरील धार्मिक स्थळावर कारवाई दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली.

शहरातील विविध भागात अनेक अनधिकृत धार्मिक स्थळ आहेत. परंतु महापालिकेकडून त्यावर कुठलीही कारवाई केली जात नव्हती. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाला फटकारले. त्यानंतर लगेच झोन पातळीवर ही कारवाई सुरू झाली. लक्ष्मीनगर झोनमध्ये लक्ष्मीनगर, शेवाळकर गार्डन, गोपालनगरमधील तर धरमपेठ झोनमध्ये वाल्मिकी नगर गोकुळपेठ, अमरावती मार्गावरील सफायक कॉम्पलेक्स, काचीपुरा रामदासपेठ आणि वेस्ट हायकोर्ट मार्गावरील धार्मिक स्थळे हटविण्यात आली. काचीपुरा पोलीस चौकीसमोर असलेल्या धार्मिक स्थळावर कारवाई केली जात असताना त्या भागातील नागरिकांनी विरोध करीत मंदिराच्या परिसरात येऊन ठाण मांडले. मात्र पोलिसांनी त्यांना हटवून कारवाईचा मार्ग मोकळा केला. यावेळी नागरिकांनी महापालिका आणि भाजपाच्या विरोधात घोषणा दिल्या. हनुमाननगर झोनमध्ये अशोक चौकातील नाल्याच्या शेजारी, आवारी चौक प्रिया बार समोरील, उमरेड मार्गावरील दूध डेअरी समोरील आणि उंटखाना मार्गावरील महाजन  कॉम्पलेक्स आणि अशोक चौक येथील धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली. सुदामा चित्रपटागृहाच्या मागील धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली

माटे चौक ते अंबाझरी उद्यान या मार्गावर शेवाळकर गार्डन संकुलासमोरील  एका धार्मिक स्थळावर कारवाई करुन ते तोडण्यात आले. अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

आज पुन्हा कारवाई

उद्या, शनिवारी शहरातील काही संवेदनशील धार्मिक स्थळावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा, अशा सूचना महापालिकेच्यावतीने पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत.