जिल्ह्य़ातील अनेक गावे रात्रभर अंधारात; महावितरणला १० लाखांचा फटका

नागपूर : जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने ग्रामीण भागातील १५१ वीज खांब कोसळले. सोबतच रोहित्र बिघडल्याने महावितरणला सुमारे १० लाख रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक गावे रात्रभर अंधारात राहिली. परंतु महावितरणने तातडीने अनेक भागात दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत केल्याचा दावा केला आहे.

जिल्ह्य़ातील शहर आणि ग्रामीणच्या आनेक भागात ३१ मे आणि १ जून रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे ग्रामीण भागातील उच्चदाबाचे ४६ आणि लघुदाबाचे १०५ वीज खांब जमीनदोस्त झाले. सोबतच १२ रोहित्रांमध्ये बिघाड झाला. सर्वाधिक फटका महावितरणच्या मौदा विभागाच्या अखत्यारित असलेल्या मौदा, रामटेक, कामठी, कन्हान, झुल्लर, वडोदा या गावांना बसला, तर मौदा विभागातील १२ पैकी ५ रोहित्रांमध्ये बिघाड झाला. या घटनांमुळे काटोल विभागातील रिधोरा, बाजारगाव, सावरगाव, जलालखेडात तासन्तास वीजपुरवठा खंडित राहिला.

दरम्यान, सावनेर विभागातील गोंडखैरी, कळमेश्वर, उमरेड विभागातील कुही, मोहाडी, डोंगरगाव, मकरधोकडा या गावातही अनेक तास वीज नव्हती. परंतु महावितरणने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेत अनेक ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत केल्याचा दावा केला. तर काही ठिकाणी वीज खांब उभारणीचे काम सुरू असल्याने येत्या २ दिवसात येथील पुरवठा सुरळीत होणार आहे. उमरेड विभागातील डोंगरगाव वीज उपकेंद्र रविवारी रात्री बंद पडले. त्याने ५,६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

महावितरणला तक्रार मिळताच रात्रीच टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करत वीजपुरवठा पूर्ववत केला गेला. दरम्यान, या घटनेमुळे रविवारी ग्रामीणच्या ५७ गावातील वीज खंडित झाली होती. त्यात कापसी, चाफेगडी, निमखेडा, पाचगाव अडका, सुरगण आदींचा समावेश होता.

सोमवारी दिवसभरात यातील बहुतेक गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला. बुटीबोरी विभागात वरोडा एथ, रुई आणि झारी येथे १४, पेवठा येथे ३, बनवाडी १३ आणि गौसी ४ विजेचे खांब रविवारी पडले. महावितरणकडून येथेही दुरुस्ती सुरू आहे.

अशी झाली हानी

महावितरणचे ग्रामीण भागात उच्च दाबाचे ४६ विजेचे खांब पडल्याने १ लाख १२ हजार रुपयांचे, तर लघुदाबाचे १०५ विजेचे खांब पडल्याने ३ लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सोबत उच्चदाबाच्या २. ६ किलोमीटर वीज वाहिनीचे ६१ हजार रुपयांचे तर ११ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिनीचे २ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. १२ रोहित्र नादुरुस्त झाल्याने महावितरणला १ लाख ६५ हजार रुपयांचा फटका बसला आहे.