News Flash

उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १५४

शहरातील दोन रुग्णालयांत सोमवारी दोघांना दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दोन जण रुग्णालयात दाखल

नागपूर : उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढल्यामुळे सर्वत्र उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सोमवापर्यंत या आजाराच्या १५४ रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील दोन रुग्णालयांत सोमवारी दोघांना दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नागपूरसह विदर्भाच्या सर्वच भागात गेल्या काही दिवसांपासून सूर्याचा प्रकोप सुरू असून तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. नागपुरातही उकाडय़ामुळे नागरिकांना मन:स्ताप होत असून शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांसह वृद्ध रुग्णांची संख्या वाढली आहे. उष्माघाताच्या एकूण १५४ रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. शहरातील तापमान वाढल्यास ही  संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी मेडिकल आणि खासगी रुग्णालयात प्रत्येकी एक अशा दोघांना दाखल केले गेले. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

तापमान वाढल्यावरही महापालिकेला अद्यापही गेल्यावर्षीच्या तुलनेत शहरातील विविध भागात आवश्यक त्या संख्येत पाणपोई व थंड निवाऱ्यांची सोय करता आली नाही.  दरम्यान, महापालिकेकडून उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी आयसोलेशन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि पाचपावलीतील सूतिकागृह रुग्णालयात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

विजेची मागणी ३० टक्क्यांनी वाढली

सध्या शहरातील वाढते तापमान लक्षात घेता मोठय़ा प्रमाणात वातानुकूलित यंत्र  आणि  कुलरचा वापर वाढला असून त्यामुळे विजेची मागणी ३० टक्क्यांनी वाढली आहे. शहरात २७ एप्रिलला ३३४ मेगाव्ॉट विजेची मागणी नोंदवली गेली होती. उन्हाळा वगळता इतर वेळी ही मागणी ३०० मेगाव्ॉटची असते. मागील  वर्षी उन्हाळ्यात विजेची मागणी ४१२ मेगाव्ॉटपर्यंत गेली  होती. महावितरणच्या काँग्रेसनगर भागातही याच प्रमाणात मागणी वाढली आहे. ग्राहकाचा वीज वापरही वाढला आहे. तो  ८० ते ९० युनिटवरून ११० चे १२०  युनिटपर्यंत वाढला आहे. महावितरणच्या काँग्रेसनगर भागात मार्च महिन्यात ग्राहकांकडून तब्बल ५ कोटी ७० लाख युनिट विजेचा वापर करण्यात आला. हिवाळ्यात या भागात साडेतीन कोटी ते चार कोटी युनिटपर्यंत हा वीज वापर असतो, हे विशेष.

मेडिकलकडून माहिती देणे सुरू

उपराजधानीतील सर्व खासगी रुग्णालयाकडून उष्माघाताच्या रुग्णांची संख्या महापालिकेला कळवली जाते. मात्र,  मेडिकलकडून एकही रुग्णाची नोंद अद्याप महापालिकेकडे पाठवण्यात आली नाही. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय शिक्षण खात्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे आता मेडिकलकडून सोमवारी रुग्णाची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आली.

शाळा बंद ठेवण्याचे आदेश

वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना अतिप्रमाणात बसत आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिक तापमानाच्या कालावधीत विशेषत: मे महिन्यात सर्व शासकीय, अशासकीय, खासगी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी  दिले आहेत. अतिरिक्त वर्ग किंवा परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात सकाळी ११ वाजेपर्यंतच शाळा व महाविद्यालये सुरू ठेवावीत. तसेच खासगी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा व महाविद्यालयांच्या प्रायार्यानी मे महिन्यात शाळा बंद ठेवण्याबाबतच्या सूचना शिक्षण उपसंचालक तथा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी  देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 4:25 am

Web Title: 154 cases of heat stroke in nagpur
Next Stories
1 शवविच्छेदनानंतरही बॉबीच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट
2 विदर्भातील शहरे जगात सर्वाधिक उष्ण 
3 प्रेयसीचा हट्ट पुरविण्यासाठी त्यानं चोरलं चक्क मांजर
Just Now!
X