सात दिवसांत १८ नवीन रुग्णांची भर; महापालिकेचा आरोग्य विभाग ढिम्मच

नागपूर : नागपूर विभागात ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांचा आकडा फुगतच चालला आहे. नवीन वर्षांच्या ३६ दिवसांत येथे या आजाराच्या रुग्णसंख्येने अर्धशतक गाठले आहे. त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. हे रुग्ण वाढत असतानाच नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृतीपलीकडे काहीही केले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

विनोद मेश्राम (४८) रा. जवाहरनगर, ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा, आणि अझीज अब्दुल (४२) रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश असे दगावलेल्या दोन्ही रुग्णांची नावे आहेत. दोघांवर उपराजधानीतील अनुक्रमे न्यू ईरा रुग्णालय आणि शुअरटेक या दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू होते. गेल्या सात दिवसांमध्ये उपराजधानीतील विविध रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूचे नवीन १८ रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. वीसहून जास्त रुग्ण आजही शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असून त्यातील काही रुग्ण अत्यवस्थ असल्यामुळे दगावणाऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.

विशेष म्हणजे, नवीन वर्षांमध्ये अद्याप एकही रुग्ण मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांत दगावला नसून सर्व मृत्यू हे खासगी रुग्णालयांतच नोंदवले गेले आहेत. नागपूर विभागात सर्वाधिक ३७ रुग्णांची नोंद ही नागपूर शहरात झाली असून येथे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्य़ातील सात रुग्णांवर उपराजधानीत उपचार झाले असून त्यातील दोघे दगावले आहेत. परराज्यातील सात रुग्णांवर उपचार झाले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्य़ात एक रुग्ण आढळला असून त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, अचूक उपचारामुळे २२ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.

दगावलेल्या रुग्णांची स्थिती

रुग्णालये                रुग्ण

व्हिम्स                     २

न्यू ईरा                     २

डॉ. जय देशमुख        १

शुअरटेक                  १

आदित्य                   २

एकूण                       ८