विनाकारण फिरणाऱ्या २५५ जणांची चाचणी

नागपूर : करोनावर नियंत्रण आणण्यासाठी आता पोलिसांनी मोर्चा सांभाळला असून नाकाबंदीच्या ठिकाणीच करोना चाचणी केली जात आहे. आज शनिवारी पहिल्याच दिवशी शहरातील पाच झोनमध्ये झालेल्या २५५ चाचण्यांमध्ये १८ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांना ताबडतोब संस्थांत्मक विलगीकरणात रवाना केले.

करोनाची परिस्थिती हाताळताना शहरातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासनही हतबल झाले आहे. उपचार, प्राणवायू व औषधांच्या अभावानेच लोकांचा मृत्यू होत आहे. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यानंतरही लोकांकडून नियमांचे पालन करण्यात येत नसल्याने पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या प्रयत्नानंतरही रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नसल्याने पोलिसांनी आता नाकाबंदीच्या ठिकाणीच विनाकारण फिरणाऱ्याची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. जुना काटोल नाका, ऑटोमोटिव्ह चौक, मेयो चौक, मानेवाडा चौक आणि प्रतापनगर चौकात ँटिजेन करोना चाचणी करण्यात आली. या ठिकाणी  अनुक्रमे शहरातील पोलीस उपायुक्त विनीता शाहु, नीलोत्पल, लोहित मतानी, विवेक मासळ आणि नुरुन हसन यांनी मोर्चा सांभाळला. पोलिसांनी रस्त्याने ये जा करणाऱ्यांची चौकशी केली असता कुणी किराणा घ्यायला, कुणी औषधासाठी जातान दिसले. बऱ्याच प्रमाणात लोक कामावर जाण्यासाठी निघाले होते. विनाकारण फिरणाऱ्या २५५ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १८ जणांचा अहवाल सकारात्मक आला. त्यांना ताबडतोब १४ दिवसांकरिता संस्थात्मक विलगीकरणात पाठवण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व नाकाबंदीच्या ठिकाणी भेट देऊन  पाहणी केली. शहरातील इतर नाकाबंदीच्या ठिकाणीही ही चाचणी करण्यात येईल. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसेल, असा विश्वास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला.

४९१ वाहने जप्त

यावेळी पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांची करोना चाचणी करण्याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली. विना मुखपट्टीने फिरणारे ३४७, सुरक्षित अंतर नियम न पाळणारे ७८० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.  ४९१ वाहने जप्त करण्यात आली.