सर्वाधिक मृत्यू नागपूर, जळगावमध्ये

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी २४ तास सेवा देत आहेत. परंतु, हे काम करताना आजपर्यंत राज्यात महावितरणच्या १८३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय साडेचारशेच्या जवळपास कर्मचारी विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यातील १८ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्वाधिक मृत्यू महावितरणच्या नागपूर, जळगाव झोनमध्ये  झाले आहेत.

मार्च २०२० ते ३ मे २०२१ पर्यंत राज्यात महावितरणच्या ६ हजार ३५१ कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली. यशस्वी उपचाराने त्यातील ३ हजार ८३० कर्मचारी-अधिकारी करोनामुक्त झाले. २ हजार ३३८ करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. यातील गंभीर संवर्गातील ४५३ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत. त्यातील १३ अतिदक्षता विभागात तर ५ जीवनरक्षण प्रणालीवर आहेत. १ हजार ८८५ रुग्णांवर विलगीकरणात उपचार सुरू आहेत. त्यातच राज्यात सर्वाधित २२ वीज कर्मचाऱ्यांचा मृत्यू महावितरणच्या नागपूर झोन कार्यालय क्षेत्रात, २० कर्मचाऱ्यांचा मृत्यू जळगाव झोन कार्यालय क्षेत्रात, १४ कर्मचा ऱ्यांचा मृत्यू भांडूप झोन, प्रत्येकी ११ कर्मचाऱ्यांचे मृत्यू लातूर, कल्याण, पुणे झोन कार्यालय क्षेत्रात झाले आहेत. कर्मचारी-अधिंकाऱ्यांना करोनाची बाधा झाल्यास तातडीने त्यांच्यावर उपचारासाठी महावितरण प्रशासनाकडून मदतही केली जात आहे.

बाधितांचे प्रमाण ८.५३ टक्के

राज्यात सर्वत्र महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो.  महावितरणकडे ५४ हजार ९१२ कायम तर १९ हजार ४९४  कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील आजपर्यंतच्या ६ हजार ३५१ कर्मचाऱ्यांना करोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे एकूण कर्मचाऱ्यांमध्ये करोनाची बाधा झालेल्यांचे प्रमाण ८.५३ टक्के आहे.

गेल्यावर्षी महावितरणने प्रत्येक कर्मचाऱ्यांना मुखपट्टी, सॅनिटायझरसाठी १ हजार रुपये दिले होते. यंदा जास्त घातक लाट आहे. त्यामुळे  कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने सगळ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये टाकावे. सोबत कुणी बाधित झाल्यास या करोना योद्धय़ावर  उपचारासाठी सर्व मदत करावी.

– कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.