दोन पिस्तूल, २० जिवंत काडतुसे जप्त; दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई

नक्षलवाद्यांना शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या दोघांना दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरून अटक केली. गणतंत्र दिनाच्या एक दिवसाआधी ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. भविष्यात नक्षलवाद्यांना शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्यांपर्यंत पोलिसांना पोहोचता येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अटक करण्यात आलेल्यामध्ये संजय संदीपन खरे (४३) व दुसरा सुपतसिंग (४९) बिहार राज्यातील मुंगेरमधील लक्ष्मीपूर, नवागड येथील राहणारा आहे.  देश व विदेशातून नक्षलवाद्यांना शस्त्रांचा पुरवठा केला जातो. नक्षलवाद्यांना जंगलापर्यंत शस्त्रे पुरवणारे अनेक  दलाल आहेत. ही साखळी मोडण्यासाठी दहशतवादी विरोधी पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. मुंबईतील दहशतवादी विरोधी पथकाला माहिती मिळाली की बिहारमधून दोघेजण रेल्वेगाडीने नागपूरच्या दिशेने येत असून ते नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवण्यासाठी जात आहेत.

या माहितीच्या आधारावर दहशतवादी विरोधी पथकाने आज शुक्रवारी सकाळपासून मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर सापळा रचला. बिहारमधून येणाऱ्या रेल्वेगाडय़ांवर त्यांची नजर होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास ०७०१० क्रमांकाची बराऊनी-सिकंदराबाद विशेष एक्सप्रेस फलाटावर पोहोचली.

एटीएसच्या पथकाने संशयितांचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी सामान्य बोगीतून प्रवास करीत होते. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन अत्याधुनिक पिस्तूल व २० जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

दोघेही आरोपी छत्तीसगड छत्तीसगडच्या जंगलातील नक्षलवाद्यांना भेटून निघाले असल्याची माहिती आहे. ते महाराष्ट्रातील  गडचिरोलीच्या जंगलात जाणार होते.  नक्षलवाद्यांना शस्त्र आवडल्यास त्यांच्याकडून  पैसे घेऊन ते मोठय़ा प्रमाणात शस्त्रांचा पुरवठा करणार होते, अशी माहिती समोर येत आहे.