गेल्या दीड महिन्यातील घटना; उपराजधानीतील दोघांचा समावेश

नागपूर : नागपूरसह विदर्भाच्या विविध जिल्ह्य़ांमध्ये कुलर हाताळताना विजेच्या धक्क्याने गेल्या दीड महिन्यात २० हून अधिक बळी गेल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यात उपराजधानीतील दोघांचा समावेश आहे. वीज यंत्रणेबाबतचा फाजील आत्मविश्वास आणि सुरक्षेबाबत केलेल्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत असल्याची माहिती महावितरणने दिली.

दिवसेंदिवस वाढणारे तापमान बघता विदर्भात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात कुलरचा वापर वाढला आहे. दरम्यान कुलरजवळ खेळताना किंवा कुलरमध्ये पाणी भरण्यासाठी टिल्लू पंप सुरू करतेवेळी विजेचा धक्का बसल्याने गेल्या दीड महिन्यात सुमारे २० मृत्यू झाले आहेत. नागपूरच्या बडकस चौक परिसरातील ऋषिकेश आमले (१८) या तरुणाचा कुलरमध्ये पाणी भरताना तर बुलकशाह अंजुम मो. अजह परवीन (३०) याचा फरशी पुसताना कुलरचा स्पर्श होऊन मृत्यू झाला. रामटेकच्या प्रियांशी सावरकर (१३) या चिमुकलीचा अंगणात खेळताना तर सावनेर तालुक्यात सविता बाडबुधे (३५) या महिलेचा कुलर सुरू करतेवेळी मृत्यू झाला. वर्धेत कुलरची ताटी ओली होत नसल्याने वरील टबाचे छिद्र मोकळे करताना शॉक लागून अंकित तुळणकरचा, धामणगावच्या उज्ज्वल व्यवहारे या तरुणाचा, चांदूर रेल्वे तालुक्यातील धनोडी येथील प्रीती नखाते या महिलेचा, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरच्या विवेक पवारचा बळी गेला. एका लहान चुकीमुळे हा प्रकार घडत आहे. प्रत्येक वर्षी हे मृत्यू टाळण्यासाठी वीज कंपन्यांसह इतर संस्थांकडून जनजागृती केली जाते. तरीही अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अपघात टाळण्यासाठी हे करा

*  कुलरचा वापर सदैव थ्री पिन प्लगवरच करावा

*  घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावे

*  अर्थिग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी

*  कुलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल अशी व्यवस्था करावी

*  पाणी भरतेवेळी कुलरचा वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा

*  कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बूडू देऊ नये

*  कुलरचे पाणी जमिनीवर सांडणार नाही त्याची काळजी घ्या

*  ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये

*  कुलरची वायर सदैव तपासून बघा

*  फायबर बाह्य़भाग असलेला किंवा चांगल्या प्रतीचा कुलर वापरावा

*  मुले व इतर सदस्य कुलरच्या सान्निध्यात येणार नाही याची खबरदारी घ्या