बदलत्या जीवनशैलीचा फटका
खाण्यापिण्यातील बदल, बैठी व बदलती जीवनशैली, भेसळयुक्त पदार्थांचे वाढत्या सेवनासह इतर अनेक कारणांमुळे लग्न झाल्यावर तब्बल २० टक्के महिलांमध्ये वंधत्व आढळत असल्याचे वेगवेगळ्या अभ्यासातून पुढे आले आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत ही संख्या भारतात फार जास्त आहे, अशी माहिती रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत इंदिरा आयव्हीएफ समूहाचे अध्यक्ष डॉ. अजय मुर्डिया यांनी दिली.
इंदिरा आयव्हीएफ समूहाच्या नागपूर येथील गोरेपेठच्या नवीन केंद्राचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी संध्याकाळी करण्यात आले. त्याकरिता नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. डॉ. अजय मुर्डिया म्हणाले की, महिलांमध्ये वंधत्वाचा त्रास वाढण्याला विलंबाने होणाऱ्या लग्नासह इतरही अनेक कारणे आहेत. जगाच्या इतर भागांच्या तुलनेत भारतात लग्न झाल्यावर सुमारे २० टक्के महिलांमध्ये हा त्रास आढळतो. या महिलांना मूल होत नसल्याने त्यांच्यासाठी टेस्टटय़ूब बेबी ही पद्धत चांगला पर्याय आहे. या पद्धतीत महिलांमधील अंडकोश व पुरुषातील वीर्याचे शुक्राणू काढून त्यावर प्रक्रिया केली जाते. हे अंडकोश महिलेच्या गर्भात प्रत्यारोपित केले जाते. ही सगळी प्रक्रिया यशस्वी झाल्यास ही महिला बाळाला निश्चित कालावधीनंतर जन्म देऊ शकते.
भारतात पहिली टेस्टटय़ूब बेबी इंदिरा आयव्हीएफ समूहाच्या प्रयत्नाने जन्मली असून आजपर्यंत देशातील ११ केंद्रांमध्ये तब्बल १० हजार यशस्वी टेटय़टय़ूब बेबीच्या प्रक्रिया केल्याचा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रात पुण्यानंतर नागपूरला दुसरे केंद्र सुरू झाले असून राज्यात या पद्धतीमुळे १ हजार ८६९ महिलांचा वंधत्वाचा त्रास कमी केल्याची माहिती त्यांनी दिली. टेटय़टय़ूब बेबीची ऑस्ट्रेलियातील क्लोज वर्किंग टेक्नोलॉजीचा वापर इंदिरा आयव्हीएफ या समूहाकडून केला जात असून त्यात आईच्या अंडकोष व पुरुषातील शुक्राणूला एकत्र केल्याची प्रक्रिया आईच्या गर्भातील तापमानात केली जात असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. पत्रकार परिषदेला प्रामुख्याने डॉ. मयुरी असुदानी, डॉ. अमोल नायक, डॉ. दिप्तीसह इतर मान्यवर उपस्थित होते.

शुक्राणू व अंडकोश वर्षांनुवर्षे संग्रहित करणे शक्य
विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली असून त्यामुळेच वंधत्व असलेल्यांकरिता महत्वाची टेस्टटय़ूब बेबी पद्धत विकसित झाली आहे. या प्रक्रियेकरिता पुरुषातील शुक्राणू व महिलेतील अंडकोष संग्रहित ठेवण्याकरिता ‘स्पम बॅंक’ ही बऱ्याच भागात सुरू झाल्याचे दिसते. या बँकेत उणे १९६ अंश सेल्सिअमध्ये पुरुषाचे शुक्राणू व महिलेचे अंडकोष वर्षांनुवर्षे संग्रहित करून ठेवणे शक्य झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.