२०० कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला असून नागपुरातील २०० पोलीस कर्मचाऱ्यांना १५ ते १६ लाखांमध्ये दोन बेडरुम, हॉल व किचन असे प्रशस्त फ्लॅट मिळणार आहे. त्यासाठी योजना तयार करण्यात आली असून लवकरच बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांना त्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न भेडसावत होता. नोकरीवर असेपर्यंत सरकारी निवासस्थान राहात असल्याने त्यांना कधी स्वत:च्या घराची जाणीव होत नाही. मात्र, निवृत्तीनंतर त्यांना घराची गरज भासते. या बाबीवर तोडगा काढताना राज्य सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मालकी हक्काची घरे देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाते. त्या-त्या जिल्ह्य़ातील पोलीस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयांनाच पुढाकार घ्यायचा असतो. असाच पुढाकार नागपुरातील अधिकाऱ्यांनी घेतला आणि २०० पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला.

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे नागपूर लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक असताना त्यांनी रेल्वेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळावी म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी म्हाडाशी चर्चा केली. त्या अंतर्गत बेलतरोडीतील म्हाडाची जागा मिळवली. तेथे २०० फ्लॅट बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याला सरकारने मंजुरी दिली आहे.

या फ्लॅटच्या खरेदीसाठी रेल्वे पोलिसांकडून अर्ज मागविले, परंतु रेल्वे पोलीस दलातील जवळपास १०० पोलिसांनीच प्रतिसाद दिला. त्यामुळे बलकवडे यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहरातील पोलीस दलातील इतर १०० पोलीस कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविले. अशाप्रकारे आता लोहमार्ग आणि नागपूर पोलीस दलातील २०० कर्मचाऱ्यांचे अर्ज ग्राह्य़ धरण्यात आले आहेत. जागा ही म्हाडाची असून बांधकामही म्हाडाद्वारेच करण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीचा खर्च नसून बांधकामाला येणारा खर्च खरेदी करणाऱ्या पोलिसांना द्यावा लागेल. त्यासाठी जवळपास १५ ते १६ लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

कर्जाची सोय

बेसा-बेलतरोडी परिसरात म्हाडाद्वारे पोलिसांकरिता तयार करण्यात येणारे फ्लॅट हजार चौरस फुटाचे असून अतिशय प्रशस्त आहेत. या योजनेत सर्व प्रकारची सुविधा राहणार असून कर्मचाऱ्यांना एकमुस्त कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण.