राखी चव्हाण, नागपूर

ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेल्या कस्तुरचंद पार्क मैदानावरील विकासकामासाठी सुरू असलेल्या उत्खननादरम्यान चार भल्यामोठ्या तोफा सापडल्या. १८१७ मध्ये भोसले आणि इंग्रज यांच्यात झालेल्या युद्धातील या तोफा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सीताबर्डी किल्यावरील सैन्यदलाने त्या त्यांच्या ताब्यात घेतल्या आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर विकासकामे सुरू आहेत. यात ‘वॉकिंग ट्रॅक’ आणि सौंदर्यीकरणाचा समावेश आहे. वारसा समितीने त्याला मान्यता दिल्यानंतर महापालिकेने काम सुरू केले. यावेळी बुधवारी रात्रीच्या सुमारास उत्खननादरम्यान चार तोफा आणि त्याचे ‘स्टँड’ सापडले. यातील दोन तोफा दहा फुटाच्या असून दोन साडेनऊ फुट लांबीच्या आहेत. याच मैदानाजवळ भोसले घराण्याचा सीताबर्डी किल्ला असून तो सैन्यदलाच्या ताब्यात आहे. नोव्हेंबर १८१७ आणि १८१८ या कालावधीत इंग्रज आणि अप्पासाहेब भोसले यांच्यात युद्ध झाले. त्यावेळी हाच सीताबर्डी किल्ला केंद्रस्थानी होता. या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाºया या मैदानावर इंग्रजांच्या कवायतीचा तळ होता. या तोफा याच काळातील असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे. या तोफा ईस्ट इंडिया कंपनीने तयार केलेल्या असून भोसल्यांनी त्या मागवल्या होत्या. शहरात त्यावेळी सक्करदरा येथे लहान आकाराच्या तोफा तयार होत होत्या आणि भोसल्यांकडे याच लहान तोफा होत्या. युद्धात निर्णायक भूमिका बजावणाºया या तोफा आहेत. जमिनीतून ऐतिहासिक तोफा मिळाल्याचे कळताच बघ्यांची गर्दी उसळली. प्रशासकीय अधिकारी, पोलीस दल याठिकाणी पोहोचले. दरम्यान, या तोफा जेसीबी यंत्राच्या सहाय्याने उचलून वाहनात टाकताना पुन्हा त्या जमिनीवर पडल्या. सीताबर्डी किल्ल्याच्या सैन्यदलाने या तोफा त्यांच्या ताब्यात घेतल्या. यावेळी सर्वात शेवटी पुरातत्त्व विभागाची चमू पोहोचली.

उत्खननादरम्यान सापडलेल्या ऐतिहासिक तोफांनी उपराजधानीची ऐतिहासिक ओळख पुन्हा एकदा समोर आणली. मात्र, हा ऐतिहासिक वारसा बाहेर काढण्याची प्रक्रिया पुरातत्त्व साहित्य संवर्धनाच्या विरोधात जाणारी आहे. उत्खननादरम्यान ऐतिहासिक वारसा सापडल्यानंतर उत्खननाची प्रक्रिया तिथेच थांबवावी लागते. याठिकाणी जेसीबी यंत्राने खोदकाम करुन तोफा बाहेर काढून ३०० मीटर दूर नेऊन ठेवल्या गेल्या. एवढेच नाही तर त्यावरील माती फावड्याने आणि सळाकीने काढण्याचा प्रयत्नही करण्यात आल्या. हेरिटेज समितीचे सदस्य व वास्तूशास्त्र विशारद अशोक मोखा या ऐतिहासिक वारस्यावर पाय ठेवून उभे होते. तर राजे मुधोजी भोसले मात्र बाजूला उभे राहून निरीक्षण करत होते. पूर्वजांच्या वस्तूविषयी त्यांची आस्था आणि आदर दिसून आला, पण हेरिटेज समितीच्या सदस्यांना त्यांच्या कर्तव्याची जाण दिसून आली नाही.

 

 

उत्खननादरम्यान सापडलेल्या वस्तुंना बाहेर काढताना जमिनीच्या आतील आणि बाहेरच्या वातावरणात बराच बदल होतो. त्या काळजीपूर्वक काढल्या गेल्या नाहीत तर त्या तुटू शकतात किंवा त्याचे पावडर होऊ शकते. त्यामुळे जमिनीतून या वस्तू बाहेर काढताना त्यावर असणाºया आवरणासहीत त्या बाहेर काढून त्या पॉलिथिनने झाकाव्या लागतात. त्यानंतर काही दिवस त्या प्रयोगशाळेत किंवा शेडमध्ये ठेवून बाहेरच्या वातावरणाशी त्या समरस होऊ द्याव्या लागतात. त्यानंतर त्यावरील आवरण म्हणजेच माती हळूहळू प्रक्रिया करुन काढावी लागते. ही पुरातत्त्व साहित्य संवर्धनाची प्रक्रिया आहे.
-डॉ. बी.व्ही. खरबडे, माजी महासंचालक, एलआरएलसी, सांस्कृतिक मंत्रालय, लखनऊ

या तोफांनी इतिहास घडवला असून त्यातून निघालेला गोळा महालपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने त्याचे योग्य आणि वैज्ञानिक पद्धतीने जतन करावे, अशी अपेक्षा आहे. कारण या विभागाने ब्रिटिशकालीन अजब बंगल्याबाबत यापूर्वी निराशा पदरी घातली आहे. तोफांच्या बाबतीत हे होऊ नये.
-मुधोजी भोसले