५४ महिलांचा समावेश, शहीद सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर पत्रकात कबुली

सरकारविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षांत गेल्या एक वर्षांत २१० सहकाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यात ५४ महिलांचा समावेश आहे, अशी कबुली नक्षलवाद्यांनी येत्या २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या शहीद स्मृती सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर दिली आहे. या कबुलीमुळे नक्षलवाद्यांना गेल्या वर्षांत मोठी मनुष्यहानी सहन करावी लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

नक्षलवादी दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात शहीद स्मृती सप्ताह पाळतात. या चळवळीची स्थापना करणारे चारु मुजूमदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा सप्ताह देशभर पाळला जातो. त्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी नक्षलवादी वर्षभरातील जिवितहानीचा आकडा जाहीर करतात. यंदा दंडकारण्य स्पेशल झोन समितीचा प्रवक्ता विकल्पने गेल्या २० जुलैला एक पत्रक जारी करून यात वर्षभरातील हानीची माहिती जाहीर केली आहे. जुलै २०१६ ते जून २०१७ या काळात मारल्या गेलेल्या २१० पैकी १४० सहकारी दंडकारण्यमधील होते. बिहार व झारखंडमध्ये २७ सहकारी मारले गेले. आंध्र व छत्तीसगड झोनमध्ये ३५, तेलंगणामध्ये १, पश्चिम बंगालमध्ये २, ओडिशामध्ये ६ तर  पश्चिम घाटात १ सहकारी पोलीस तसेच सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. चकमकीत ठार झालेल्यांमध्ये केंद्रीय समितीचे दोन सदस्य होते. याशिवाय पीपल्स गुरिल्ला आर्मी, अ‍ॅक्शन टीम तसेच ग्रामरक्षक दलाचे सदस्यसुद्धा या संघर्षांत ठार झाले, असे या पत्रकात म्हटले आहे. या वर्षभरात एकूण ५४ महिला सहकारीसुद्धा ठार झाल्या. याशिवाय केंद्रीय समितीचे सदस्य नारायण संन्याल यांचा नैसर्गिक मृत्यू ही सुद्धा चळवळीसाठी मोठी हानी आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

याच वर्षांत वृद्धत्त्व तसेच सर्पदंशाने काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. दरवर्षी यासंदर्भातील आकडा देणाऱ्या नक्षलवाद्यांनी यंदा तो देण्याचे टाळले आहे. याच पत्रकात देशातील कारागृहाच्या व्यवस्थेवरही टीका करण्यात आली असून सरकारने योग्य काळजी न घेतल्याने दोन सहकाऱ्यांचा मृत्यू कारागृहात झाला, असे विकल्पने म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांची नक्षलवाद्यांनी जारी केलेली आकडेवारी बघितली तर दरवर्षी ही चळवळ साधारण १५० मृत्यूंची कबुली देत आली आहे. यंदा त्यात वाढ झाली आहे. आंध्रच्या ग्रेहाउंड या विशेष दलाने मलकानगिरी जिल्ह्यत याच वर्षांत एकाच चकमकीत ३५ नक्षलवाद्यांना ठार मारले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांचा आकडा वाढला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पत्रकात छत्तीसगडमध्ये ११ मार्चला भेज्जी व १४ एप्रिलला बुरकापालला झालेल्या चकमकीत मोठय़ा संख्यने सुरक्षा दलाच्या जवानांना ठार केल्याबद्दल सहभागी सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. चळवळीत सहभागी असलेल्या सर्वानी या वर्षभरातील मृत्यूचा बदला घेण्यासाठी नवीन वर्षांत सुरक्षा दलांवरील हल्ले वाढवावे, तीच या सहकाऱ्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन नक्षलवाद्यांनी या पत्रकातून केले आहे.