गेल्या चार वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१४ माणसांचा बळी गेला असून या मानवी मृत्यूच्या नुकसानभरपाईवर  चार वर्षांत वनखात्याला तब्बल २६ कोटी चार लाख रुपये द्यावे लागले आहेत.

मानव-वन्यजीव संघर्षांवर वनखात्याला आजतागायत तोडगा शोधता आला नाही. माणसांसह वन्यप्राणीही मृत्युमुखी पडत आहेत. एकीकडे उपाययोजनांवर खर्च तर दुसरीकडे नुकसानभरपाईवर खर्च यातच वनखात्याची तिजोरी रिकामी होत आहे. या चार वर्षांत वाघाच्या हल्ल्यात १०१ माणसे मृत्युमुखी पडली. त्यातील सर्वाधिक ३८ माणसांचा बळी २०२० मध्ये गेला. १२ कोटी ३७ लाख रुपये वनखात्याने नुकसानभरपाईवर खर्च के ले. बिबटय़ाच्या हल्ल्यात ६४ माणसे मृत्युमुखी पडली. त्यातील सर्वाधिक ३२ माणसांचा बळी २०२० मध्येच गेला. आठ कोटी ३० लाख रुपये वनखात्याने नुकसान भरपाई दिली. वन्यजीवप्रेमी व माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या माहितीनंतर ही आकडेवारी समोर आली आहे. या चार वर्षांची तुलना के ल्यानंतर  २०२० हे वर्ष वनखात्यासाठी सर्वाधिक अडचणीचे ठरले. कारण मानव-वन्यजीव संघर्षांचा आलेख या वर्षांत झपाटय़ाने वाढला आहे. वाघ आणि बिबटय़ाचे सर्वाधिक हल्ले याच वर्षांत झाले आहेत. हा संघर्ष माणसांसोबतच वन्यप्राण्यांसाठीही कर्दनकाळ ठरला आहे. संघर्षांतून मानवी हल्ले झाले आणि गावकऱ्यांचा दबाव वाढला की खात्याकडून थेट त्याला पकडण्याचे, नाही तर गोळी घालून ठार मारण्याचे आदेश देण्यात येतात. मानवी मृत्यू झाला की कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात येते. या दोन्ही प्रक्रियेत खात्याचीच तिजोरी रिकामी होत आहे, पण वनखात्याला हा संघर्ष थांबवण्यात अपयश आले आहे. २०२० या एका वर्षांत वाढलेल्या संघर्षांच्या आलेखामुळे पुन्हा एकदा वनखात्याची कार्यशैली चर्चेचा विषय ठरली आहे.

वर्ष              मृत्यू            नुकसान भरपाई

२०१७          ५४        चार कोटी ३२ लाख रुपये

२०१८           ३३        तीन कोटी १२ लाख रुपये

२०१९           ३९        पाच कोटी ८५ लाख रुपये

२०२०          ८८       १२ कोटी ७५ लाख रुपये