शहरातील सर्वाधिक २२ हजार ८५८ रुग्ण; २४ तासांत ३४ मृत्यू; १,२२७ बाधितांची भर

नागपूर : गेल्या २४ तासांत ३४ करोनाबाधितांचा मृत्यू नोंदवण्यात आला, तर नवीन १,२२७ बाधितांची भर पडल्याने आजपर्यंतच्या बाधितांची संख्या थेट तीस हजारांच्या (२९ हजार ५५५ रुग्ण) उंबरठय़ावर पोहचली आहे.

जिल्ह्य़ातील विविध रुग्णालयांमध्ये २४ तासांत झालेल्या ३४ मृत्यूंमध्ये नागपूर महापालिका हद्दीतील २९ मृत्यू, ग्रामीण भागातील ४ मृत्यू, तर जिल्ह्य़ाबाहेरून आलेल्या एकाचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक  मृत्यू हे मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांतील आहेत. इतर  मृत्यू शहरातील इतर शासकीय व खासगी रुग्णालयांत झाले आहेत. या मृत्यूंमुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची एकूण संख्या १ हजार ४५ वर पोहचली आहे. त्यातील सर्वाधिक ७९४ मृत्यू शहरी भागातील, १५३ मृत्यू ग्रामीण भागातील तर ९८ मृत्यू  इतर जिल्ह्य़ांतील बाधितांचे आहेत.

दरम्यान, शहरात २४ तासांत पुन्हा १ हजार २२७ नवीन बाधितांची नोंद झाली असून त्यात सर्वाधित १ हजार १५ बाधित शहरी भागातील आहेत. २११  ग्रामीण भागातील तर १ रुग्ण जिल्ह्य़ाबाहेरील आहे.

१,२२३ जण करोनामुक्त

जिल्ह्य़ात बाधित वाढत असतानाच दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. दिवसभरात  शहर भागात १ हजार १११ जण तर ग्रामीण भागात ११२ असे एकूण १ हजार २२३ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे येथील आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या थेट १९ हजार २४४ वर पोहचली आहे. त्यात शहर भागातील १४ हजार ५७७ जण तर ग्रामीण भागातील ४ हजार ६६७ जणांचा समावेश आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्तांसह २३ जणांना करोना

शहर पोलीस दलाला करोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त, परिमंडळ पाच मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह २३ कर्मचारी सोमवारी सकारात्मक आढळले. बाधितांची संख्या सतत वाढत असल्याने पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षकासह २३ कर्मचारी गृहविलगीकरणात आहेत. सोमवारी सकारात्मक आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ११ पोलीस कर्मचारी सीताबर्डी पोलीस ठाण्यातील आहेत. दरम्यान, परिमंडळ पाचमधीलच बाधित एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची सोमवारी प्रकृती खालावली. त्यामुळे या अधिकाऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय  यांच्या मार्गदर्शनात पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे व गुन्हेशाखेचे समन्वय पथक करोबाधित पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

मृतदेह हलवण्यासाठीही अनेक तास

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये सध्या मृत्यू वाढले आहेत. येथे रोज मोठय़ा संख्येने इतरही बाधितांच्या तपासण्यांचा भार आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवरही  कामाचा ताण वाढतच आहे. त्यामुळे  कोविड रुग्णालयांमध्ये बाधिताचा मृत्यू झाल्यास  मृतदेह शवागारात हलवण्यासाठीही तासन्तास लागत आहेत. रविवारी दुपारनंतर येथील एका अतिदक्षता विभागात दोन ते तीन बाधितांचे मृत्यू झाले. हे मृतदेह हलवले जात नसल्याने  इतर रुग्णांमध्ये  भीती निर्माण झाली. यापैकी काही जण इतर रुग्णालयांत त्यांना हलवले जाऊ शकते काय म्हणून चाचपणी करत होते. परंतु खासगी रुग्णालय त्यांना घेण्यास तयार नव्हते.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांना करोनाची बाधा

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे आणि त्यांच्या मुलालाही करोनाची लागण झाली आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे  यांना सोमवारी मेडिकलच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रा. कवाडे यांच्या छातीत निमोनिया आढला असला तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रा. कवाडे यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचा मुलगा घरी विलगीकरणात आहे.

दोन हजारांवर सक्रिय रुग्ण

शहरात ६ हजार ९०३ तर ग्रामीण भागात २ हजार ३६३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सर्वाधिक ५ हजार ८१२ रुग्णांवर गृह विलगीकरणात तर तब्बल २ हजार २७७ जणांवर विविध शासकीय व खासगी कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वाधिक रुग्ण मेडिकल, मेयो रुग्णालयांत दाखल आहेत.