राज्यातील सर्व १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत २४ तास बाह्य़रुग्ण विभागाची सेवा सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी सर्व महाविद्यालयांना वर्ग एकच्या डॉक्टरांपासून वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांपर्यंत किती अतिरिक्त कर्मचारी, इतर काय सुविधा लागणार याची माहिती वैद्यकीय शिक्षण खात्याने मागितली आहे. परंतु आवश्यक संख्येने नवीन डॉक्टर न मिळाल्यास पुन्हा सेवेवरील डॉक्टरांवरच कामाचा ताण वाढणार आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित असलेली नागपूरच्या मेडिकल, मेयोसह सर्व १८ शासकीय रुग्णालये टर्शरी दर्जाची आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांसह इतर रुग्णालयांतून येथे अत्यवस्थ रुग्ण उपचाराला पाठवले जातात. त्याहून अधिक रुग्ण थेट या रुग्णालयांतही उपचाराला येतात. येथे येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर व प्रत्यक्ष भरलेली पदे कमी आहेत. करोना काळात सुरुवातीला खासगी रुग्णालयांनी हात वर केल्यावर या रुग्णालयांनीच करोनाग्रस्तांवर उपचार केले. कालांतराने येथे कोव्हिड रुग्णालये सुरू झाली.

नागपूरच्या मेडिकलमध्ये वर्षांला सुमारे १० लाख रुग्णांवर बाह्य़रुग्ण विभागात तर सुमारे ९० हजार रुग्णांवर आंतरुग्ण विभागात उपचार होतात. मेयोत सुमारे ७ लाख रुग्णांवर बाह्य़रुग्ण विभागात तर सुमारे ५० हजार रुग्णांवर आंतरुग्ण विभागात उपचार होतात. प्रत्येक वर्षी ही रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यानंतरही शासनाकडून येथे नवीन पदे मंजूर केली जात नाही. मुंबईसह राज्यातील इतरही भागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांची हीच स्थिती आहे. त्यामुळे येथे कार्यरत डॉक्टरांवर कामाचा ताण वाढतच आहे. त्यातच शासनाने चांगल्या संकल्पनेतून येथे २४ तास बाह्य़रुग्ण विभाग सुरू करण्याचे ठरवले आहे. अधिष्ठात्यांनाही या सेवेबाबत अभिप्रायही मागण्यात आले आहेत.

आताची व्यवस्था काय?

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत सध्या सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत बाह्य़रुग्ण विभागाकडून सेवा दिली जाते तर नागपूरच्या मेडिकलसह काही रुग्णालयांत दुपारी २ वाजेपर्यंत बाह्य़रुग्ण  विभागाची सेवा दिली जाते. त्यानंतर अपघात, इतर अत्यवस्थ रुग्णांना आपत्कालीन विभागात रुग्णसेवा दिली जाते.

सामाजिक अंतर राखण्यासाठी फायद्याचे

नागपूरच्या मेडिकल, मेयोसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत रोजच रुग्णांची प्रचंड गर्दी असते. करोना काळात सार्वजनिक प्रवासाची  साधने नसल्याने ही गर्दी ओसरली होती. परंतु हळूहळू टाळेबंदी शिथिल होत असल्याने पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. त्यातच  सकाळच्या वेळेत शासकीय व खासगी नोकरदारांना उपचारासाठी जाण्यात अडचणी येतात. २४ तास बाह्य़रुग्ण सेवा सुरू झाल्यास रुग्ण वेगवेगळ्या वेळेत  सामाजिक अंतर पाळून उपचार घेऊ शकतील.

‘‘वैद्यकीय शिक्षण खात्याने २४ तास बाह्य़रुग्ण सेवा सुरू करण्याबाबत माहिती मागितल्याने एक समिती गठित करून आवश्यक डॉक्टरांसह इतर माहिती गोळा गेली जात आहे. लवकरच हा प्रस्ताव वैद्यकीय संचालकांना सादर केला जाईल.’’

डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो, नागपूर.