News Flash

भारतात रोज २५ हजार टन प्लास्टिकचा कचरा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

नागपूर : भारतात प्लास्टिकच्या वापराला बंदी घालण्यात आली असली तरीही दररोज २५ हजार टनांहून अधिक प्लास्टिकचा कचरा येथे तयार होतो. त्यातील ४० टक्केही कचरा गोळा केला जात नाही. तो वातावरणात तसाच पडून राहतो. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेच शुक्रवारी याची कबुली दिल्याने प्लास्टिकबंदीचा पुरता फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सततच्या आर्थिक विकासामुळे ग्राहकांची वस्तूंची मागणी वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्लास्टिकचा वापरही वाढत आहे. वस्तूंचे सुरक्षित पॅकेजिंग आणि कमी किमतींमुळे प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिकला हरित पर्याय शोधणे हेदेखील एक आव्हान आहे. केंद्राने प्लास्टिकबंदीसाठी नियम तयार केले आणि प्लास्टिकबंदी केली, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.

पुनर्नवीकरण केलेले प्लास्टिक अनेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापरले जाते. उर्वरित दहा हजार ५५६ टन प्लास्टिक कचरा वाया जातो, तो एकूण कचऱ्याच्या ४० टक्के इतका आहे. प्लास्टिकच्या जैवविघटनाच्या तंत्रज्ञानाच्या निर्मिती आणि संशोधनासाठी सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लास्टिक इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजीने एक तज्ज्ञांचा गट स्थापन केला आहे. स्वच्छ भारत मोहिमेचा एक भाग म्हणून २०२२ पर्यंत देश प्लास्टिकमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. मात्र, सध्याची प्लास्टिकची स्थिती पाहता हा संकल्प पूर्णत्वास जाईल का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

अहवालात काय?

’केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, भारतातील ६० मोठय़ा शहरांमधून दररोज अंदाजे चार हजार ५९ टन प्लास्टिक कचरा तयार होतो.

’देशभरात प्रत्येक दिवशी सुमारे २५ हजार ९४० टन कचरा तयार होतो.

’देशात साधे प्लास्टिक, जाड प्लास्टिक आणि त्याच्या पुनर्वापराच्या नोंदणीकृत कंपन्यांची संख्या ४ हजार ७७३ इतकी आहे.

’दररोज जमा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यापैकी केवळ १५ हजार ३८४ टन प्लास्टिक गोळा करून त्याचा पुनर्वापर केला जातो.

’पुनर्वापराचे प्रमाण एकूण प्लास्टिक कचऱ्याच्या ६० टक्के इतके आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2019 3:26 am

Web Title: 25 thousand tons of plastic waste every day in india zws 70
Next Stories
1 विदर्भातील चारही महापालिकांमध्ये भाजपचेच महापौर
2 नव्या महापौरांपुढे आर्थिक आव्हान
3 नीरीच्या पाणी तपासणी दरवाढीमुळे शासनापुढे पेच
Just Now!
X