संपूर्ण राज्यात ‘बर्ड-फ्लू’च्या भीतीने घर केले असतानाच जिल्ह्य़ातील कळमेश्वरजवळील उबगी गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये २६५ कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने मृत कोंबडय़ांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्यांच्या शरीराचे काही नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले आहे.

मागील आठवडय़ात जिल्ह्य़ातील कोंढाळी भागात अज्ञात आजाराने शेकडो पोपटांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घडलेली ही जिल्ह्य़ातील दुसरी घटना आहे. पोपटांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र पोपट व कोंबडय़ांचा मृत्यू राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव होत असल्यानंतरचा आहे. विशेष म्हणजे, नागपूर शहरालगतच्या गावांमधून शहरात कोबंडय़ांचा पुरवठा होतो. हे येथे उल्लेखनीय.  कळमेश्वरजवळील उबगी गावालगत पोल्ट्री फार्म आहे. तेथे हजारो कोंबडय़ा ठेवण्यात आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यापैकी २६५ कोंबडय़ांचा अचानाक मृत्यू झाला. या घटनेची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एका मृत कोंबडीचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले, असे पशुसंवर्धन अधिकारी युवराज केणे यांनी सांगितले.

घटनेच्या रात्री पोल्ट्री फार्मजवळ एक सार्वजनिक कार्यक्रम झाला. त्यात डी.जे. वाद्य वाजवण्यात आले. त्याचा आवाज अधिक होता. त्याचा परिणाम कोंबडय़ांवर झाला असावा, असे पोल्ट्री फार्म चालकांचे म्हणणे आहे. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. कोंबडय़ांच्या मृत्यूचे खरे कारण अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे. पोपटांपाठोपाठ कोंबडय़ांचा झालेल्या मृत्यूमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, बर्ड फ्लूच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा  परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

शहरात चिकन, अंडय़ांची मागणी घटली

चिकन खाल्ल्याने करोनाचा प्रादुर्भाव होतो, अशी अफवा पसरल्याने चिकन व पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आले होते. आता नव्या वर्षांत बर्ड फ्लूने विदर्भात शिरकाव केल्याच्या वृत्ताने नागपूरकरांनी चांगलाच धसका घेतला आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात चिकनची मागणी कमी झाली असून विक्रेत्यांनी किंमतीही कमी केल्या आहेत.   चिकनऐवजी नागरिक मटण, मासोळी घेण्यास पसंती देत आहेत. एरवी ३०० रुपये किलो असलेले बॉयलर चिकन आता दीडशे रुपयांवर आले आहे. तर अंडी प्रती नग ८ वरून ५ रुपयांवर आले आहे. गावरानी चिकन ६३० वरून ५०० रुपये किलोवर आले आहे. घाऊक बाजारात हैदराबाद व मध्यप्रदेश येथून नागपुरात कोंबडय़ांचा पुरवठा होतो. एरवी त्यांची मागणी अधिक असते. मात्र गेल्या पाच-सात दिवसांपासून शहरात मागणी कमी झाल्याने चिकनच्या गाडय़ाही कमी येत आहेत.  व्ययवसाय अडचणीत येत असल्याचे पाहत चिकन विक्रेत्यांच्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवर चिकन कसे सुरक्षित आहे असे संदेश स्टेटस म्हणून ठेवले आहेत. यामध्ये बातम्यांचे कात्रण आणि डॉक्टरांच्या सल्ल्यांचे व्हिडीओ ठेवण्यात आले आहेत.