प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्याने काळ्या यादीत

नागपूर :  ठरवलेल्या वेळेत गृहप्रकल्पाचे बांधकाम पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) विदर्भातील २८ प्रकल्पांना काळ्या यादीत टाकले आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

महारेराने  २०१७ व २०१८ सालच्या राज्यातील ६४४ प्रकल्पांना काळ्या यादीत टाकले आहे.  ग्राहकांना दिलेल्या तारखा उलटून दोन-चार वर्षे

गेल्यानंतरही घरांचा ताबा अजून मिळालेला नाही. १६ टक्के प्रकल्प हे २०१७ तर ८४ टक्के प्रकल्प हे २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु बांधकाम व्यावसायिकांनी यामध्ये चालढकल केली. महारेराने कारवाईचा बडगा उगारलेल्यांपैकी विदर्भातील ५ जिल्ह्यातील २८ प्रकल्प आहेत. यामध्ये नागपूरचे १३,चंद्रपूरचे २, बुलढाणाचे २, अमरावतीतील ७ तर अकोला येथील ४ प्रकल्पांचा समावेश  आहे. विदर्भात २०१७ चे ६ तर २०१८ मधील २२ प्रकल्प अजूनही अपूर्ण आहेत.

शहरातील इतर बांधकाम व्यावसायिकांसोबतच क्रेडाईच्या दोन-चार बांधकाम व्यावसायिकांना महारेराने काळ्या यादीत टाकले आहे. मात्र यासंदर्भात या व्यावसायिकांना विचारणा केली असता त्यांनी क्षुल्लक कारणांमुळे काळ्या यादीत टाकल्याचे सांगितले. प्रकल्प वेळेत पूर्ण झाले व ग्राहकांना घरेही हस्तांतरित झाली. मात्र त्या संदर्भातील कागदांची पूर्तता शासनाकडे केली नसल्याने यादीत नाव टाकल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या संदर्भात लवकरच बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ.

– विजय डरगन, अध्यक्ष, क्रेडाई नागपूर.

काळ्या यादीतील प्रकल्प

नागपूर –  पिरॅमिड सिटी-२, सिटी एॅम्प्रेस मिल, महालक्ष्मीनगर-१, फॉर्च्युन हाईट्स, गंगवानी इंपेरिअल, पार्क मेंशन ४७, लक्सरिया अपार्टमेंट, एसएलपीएल फेस २, अंतरा १, रॉयल हाईट्स, इम्पेरिअल हाईट्स, दशरथ सदन, नमन एॅकझॉटिक. अकोला-  निसर्ग कॉर्नर २, शकंबरी टॅरेस, विठ्ठल रुक्मिणी अपार्टमेंट, राम टेक हॉईट्स. अमरावती – दि बेस्ट रेसिडेंसी, आदर्श रेसिडेंसी, सिल्वर ओक प्लाझा, साई श्रद्धा रेसिडेंसी, श्री साई श्रद्धा अपार्टमेंट, ईश्वरी कॉलनी, बिझी लॅन्ड हाईट्स. चंद्रपूर – वसंत विला, श्री बालाजी टॉवर्स. बुलढाणा –  साईप्रकाश अपार्टमेंट, नक्षत्र रेसिडेंसी.