06 December 2019

News Flash

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील बालरोग विभाग सलाईनवर!

विदर्भातील सहा महाविद्यालयांत केवळ २८ व्हेंटिलेटर

(संग्रहित छायाचित्र)

महेश बोकडे

मुख्यमंत्र्यांसह बरेच वजनदार मंत्री असलेल्या विदर्भातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील (मेडिकल) बालरोग विभागच सलाईनवर आहे. येथे अत्यवस्थ नवजात बालकांसाठी एनआयसीयू आणि मोठय़ा बालकांच्या पीआयसीयूत कमी खाटा असून केवळ २८ व्हेंटिलेटर आहेत. बिहारमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या चमकी तापासदृश्य आजाराचा येथे उद्रेक झाल्यास ही सोय पुरेसी नाही.

उपराजधानीत मेडिकल आणि मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. मेडिकलच्या बालरोग विभागात १२० तर मेयोत ९० सामान्य खाटा असून यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, अकोला येथेही ६० ते ९० खाटा आहेत. विदर्भातील सहाही रुग्णालयांत शून्य ते सहा महिन्यांच्या मुलांसाठी केवळ १२७ खाटा एनआयसीयूत (अतिदक्षता विभाग) आणि सात महिने ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलासाठी केवळ ३२ खाटा पीआयसीयूत (अतिदक्षता विभाग) आहेत. यवतमाळला पीआयसीयू नसल्याने बालकांना सामान्य वार्डातच ठेवले जाते. विदर्भातील सर्व महाविद्यालयांतील एनआसीयूत सध्या १४ तर पीआयसीयूमध्ये केवळ १३ व्हेंटिलेटर आहेत.

सोबत नागपूरच्या मेडिकलसह अकोलाच्या रुग्णालयांतच प्रत्येकी दोन पीपॅप हे व्हेंटिलेटर सदृश्य यंत्र आहे. व्हेंटिलेटर कमी असल्याने सर्व रुग्णालयांत बालकांना अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते. दुर्दैवाने यात काहींचा मृत्यूही होतो. या सर्व रुग्णालयांत व्हेंटिलेटरवरील बालकांच्या रक्तातील ऑक्सिजनसह इतर मात्रा तपासण्यासाठी अत्यावश्यक असलेली एबीजी यंत्रही यवतमाळ आणि चंद्रपूर वगळता कुठेच नाही. त्यामुळे ही सोय नसलेल्यांना इतर विभागात नमुने पाठवावे लागतात. त्याच्या अहवालाला विलंब होत असल्याने बऱ्याचदा उपचाराची दिशा चुकतो. नागपूरच्या मेडिकल, चंद्रपूर आणि अकोला वगळता इतर एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत स्वयंचलित मॉनिटरिंग यंत्रणा एनआयसीयू आणि पीआयसीयूत नाही.

रुग्णांसोबत भेदभाव

विदर्भातील चंद्रपूर मेडिकलमध्येच बाहेरच्या रुग्णालयांतून उपचारासाठी आलेल्या अत्यवस्थ बालकांसाठी स्वतंत्र १५ खाटांचे आऊट बॉन एनआयसीयूची सोय आहे. नागपूरच्या मेडिकल, मेयोसह इतर संस्थांमध्ये या बालकांना सामान्य वार्डातच ठेवले जाते. रुग्णालयांत जन्मलेल्या बालकांसह येथील रुग्णांना प्राधान्य दिले जात असल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगितले जाते. निश्चितच या प्रकाराने बाहेरून येथे येणाऱ्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, एप्रिल- २०१८ ते मार्च २०१९ मध्ये विदर्भात बालमृत्यूचे प्रमाण वाढून ६६७ वर पोहचले. त्याला हेही एक कारण असू शकते.

शासनाने विदर्भातील सर्व रुग्णालयांत एनआयसीयू आणि पीआयसीयूत खाटा आणि व्हेंटिलेटर वाढवण्याची गरज आहे. सोबत बाहेरून येथे हलवलेल्या बालकांनाही अतिदक्षता विभागात खाटा मिळायला हव्या.

– डॉ. गिरीश चरडे, माजी सचिव, इंडियन पेडियाट्रिक्स असोसिएशन.

विदर्भातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील बालरोग विभागातील जनरल वार्ड, एनआयसीयू आणि पीआयसीयूत नियमानुसार आवश्यक खाटा उपलब्ध आहेत. त्यात आणखी भर घातली जाणार आहे.

– डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.

First Published on June 22, 2019 12:28 am

Web Title: 28 ventilators in six government medical college of vidarbha
Just Now!
X