* पूर्व विदर्भात करोना रुग्ण ३०० पार ! * ‘लता मंगेशकर’ मधील रुग्णाला करोना

नागपूर : बर्डीतील लता मंगेशकर रुग्णालयात उपचाराला आलेल्या एका महिलेला करोना असल्याचे स्पष्ट होताच आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून या रुग्णाला मेडिकलमध्ये हलवत येथील ५ डॉक्टरांसह ३२ जणांना सक्तीने विलगीकरणात हलवण्यात आले आहे. दुसरीकडे पूर्व विदर्भातील करोनाग्रस्तांच्या संख्येने आता तीनशेचा टप्पा ओलांडला असून सर्वाधिक २९८ रुग्ण हे नागपुरातील आहेत.

लता मंगेशकर रुग्णालयात करोनाचे निदान झालेली ५० वर्षीय महिला हंसापुरी परिसरातील आहे. तिला हगवणीचा त्रास असल्याने लता मंगेशकर रुग्णालयात रविवारी हलवण्यात आले होते.

करोनाचे लक्षणे नसली तरी हंसापुरी परिसर मोमीनपुराला लागून असल्याने रुग्णालय प्रशासनाने खबरदारी म्हणून तिचे नमुने तपासणीसाठी मेयोच्या प्रयोगशाळेत पाठवले. सोमवारी तिला करोनाची बाधा असल्याचे स्पष्ट होताच प्रशासनात खळबळ उडाली. तातडीने तिला मेडिकलच्या कोविड रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर महापालिकेने रुग्णालयातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५ डॉक्टर, ५ परिचारिकांसह एकूण ३२ आरोग्य कर्मचाऱ्यांना विलगीकरणात हलवले.

दुसरीकडे मेडिकलच्या प्रयोगशाळेतही मोमीनपुरा परिसरातील एका पुरुषाला या आजाराची बाधा झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे नागपुरातील एकूण बाधितांची संख्या थेट २९८ वर पोहचली. तर पूर्व विदर्भातील इतर जिल्हे असलेल्या गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्य़ांतही या विषाणूचे ५ रुग्ण आतापर्यंत आढळल्याने नागपूर विभागातील एकूण बाधितांची संख्या थेट ३०३ वर पोहचली आहे. सातत्याने नागपुरात रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. परंतु या विषाणूची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मोठय़ा संख्येने नागरिकांना विलगीकरणात घेतले जात आहे.

आणखी चार करोनामुक्त!

उपराजधानीत यशस्वी उपचाराने बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. सोमवारी मेडिकलचा एक आणि मेयोतील तीन अशा चौघांना करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाल्यावर रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. त्यात मेयोतील सतरंजीपुरातील १७ वर्षीय तरुणी, ५० वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे, तर मेडिकलमधूनही एकाला करोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. त्यामुळे शहरातील एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्याही आता थेट ९६ वर पोहचली आहे.

मेडिकलमध्ये एकूण दाखल रुग्णांचा उच्चांक

उपराजधानीत बाधित रुग्ण वाढत असल्याने मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांचाही रोज नवीन उच्चांक नोंदवला जात आहे. सोमवारी मेडिकलमध्ये करोनाचे १२० रुग्ण सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दाखल असल्याचे पुढे आले, तर मेयोतही ८० हून अधिक रुग्ण दाखल होते. दरम्यान मेयोचे नवीन कोविड रुग्णालय सेवेत आले असून तेथे रुग्ण ठेवणे आता सुरू झाले आहे.