अजित पवार यांची टीका ’ संघर्षांचा दुसरा टप्पा सुरू

सरकारच्या नाकत्रेपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असून, आता हे आत्महत्येचे लोण त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचले आहे. ‘योग्य वेळी कर्जमाफी करू’, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुहूर्त निघणार आहे की नाही, असा संतप्त सवाल करत विरोधकांनी संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून शनिवारपासून प्रारंभ केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर पुन्हा एकदा सर्व विरोधक एकवटले आहेत.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीरिपा, सपा, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष आदी विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकार विरोधात संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून शनिवारी सकाळी प्रारंभ केला. सिंदखेडराजा येथील राजवाडा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांना नेत्यांनी अभिवादन करून यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर सिंदखेडराजा येथे जाहीर सभेत नेत्यांनी सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, पीरिपाचे आ.प्रा.जोगेंद्र कवाडे, सपाचे आ.अबू आझमी, जयंत पाटील, आ.जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेंद्र िशगणे, राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव श्रीकांत पिसे पाटील, आ.राहुल बोंद्रे, आ.सुनील केदार, आ.हर्षवर्धन सपकाळ, आ.अमित झनक आदींसह विरोधी पक्षातील आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, १५ दिवसात उत्तर प्रदेश सरकार ३६ हजार कोटींचे कर्जमाफ करते. महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांत फडणवीस सरकारला हे का जमले नाही, नाकर्त्यां सरकारमुळे गेल्या २ वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे काल एका शेतकऱ्याच्या मुलीवर आत्महत्या करण्याची वेळ आली. सरकार शेतकऱ्यांचा आणखी किती अंत पाहणार आहे, सरकारच्या या वेळकाढू धोरणाविरोधात आता शेतकऱ्यांनी पेटून उठले पाहिजे, असे म्हणाले.

दिग्गज नेत्यांची अनुपस्थिती

विरोधी पक्षातील नेत्यांच्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. नेत्यांची अनुपस्थिती हा चच्रेचा विषय ठरला. या यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे आदींनी यात्रेला दांडी मारली. राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या वावडय़ा उठत असल्याने ते यात्रेत सहभागी होणार नाहीत, अशी वर्तवण्यात आलेली शक्यता खरी ठरली.

दुसऱ्या टप्प्यातही वातानुकूलित बस

संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून वातानुकूलित बस आणि वाहनांच्या ताफ्यात सुरू झाल्याने टीका झाली. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातही यात्रेतील नेत्यांसाठी वातानुकूलित बसची व्यवस्था करण्यात आली होती. विरोधी पक्षातील नेत्यांचा शाही थाट कायम राहिला. सिंदखेडराजा येथून प्रारंभ झालेल्या दुसऱ्या टप्प्यातही वातानुकूलित बस आणि महागडय़ा गाडय़ांच्या ताफ्यासह यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेतील वाहनांमुळे ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत होत होती.