रेल्वेस्थानकावर ३० लाखांची रोकड जप्त; एक कोटींचे दागिने जप्त

शहरातील एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून हवाला व्यापार होत असल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसमधून ३० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच रेल्वेने सोन्या-चांदीच्या दागिन्यांची तस्करी होत असल्याची बाब समोर आली आहे. मुंबईहून दुरान्तो एक्सप्रेसने नागपूरला येत असलेले १.१०२८ कोटींचे दागिन्यांचे जप्त करण्यात आले. त्याचे बाजारमूल्य कोटय़वधीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसमध्ये झडती घेऊन एस-६ डब्यातील एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगमध्ये एका बंद लिफाफ्यात ३० लाख रुपये होते. यात २२००१ नोटा दोन हजाराच्या आणि उर्वरित नोटा पाचशे रुपयांच्या होत्या. या प्रकरणात अकोला येथील महेंद्र तरोडे (३१) यास अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून मुंबईहून कुरिअर कंपनीचा दुसरा कर्मचारी श्याम वंकुवाळे (३८) हा सोन्याची दागिने नागपूरला घेऊन येत असल्याची माहिती पुढे आली. नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने मुंबईहून मदत मागितली. नागपूरला येणारी दुरान्तो रवाना झाली होती.

त्यामुळे आरपीएफचा एक जवान कसारा आणि दुसरा इगतपुरी येथून या गाडीत चढले. ते संशयितावर पाळत ठेवून होते. गाडी नागपुरात सकाळी पोहोचल्यावर श्याम वंकुवाळे यास ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडील बॅगेमधून दागिन्यांचे २९ पाकीट जप्त करण्यात आले. त्यात काही सोन्याचे आणि काही चांदीचे दागिने होते. आयकर खात्याचे अधिकारी दागिन्यांचे कागदपत्रे तपासत आहेत.

मुंबई-नागपूर हवाला व्यापार

नागपुरातील ‘इंद्रायणी लॉजिस्टिक’ या कुरिअर कंपनीचे हे कर्मचारी आहेत. नागपूरहून मुंबईला हवाला मार्फत रोख रक्कम पाठवली जाते. मुंबईहून नागपूरला सोने-चांदीचे दागिने आणले जाते, अशी माहिती या कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे. इंद्रायणी लॉजिस्टिकचे मुंबईत देखील कार्यालय आहे. या कंपनीची ही नेहमीची पद्धत आहे. कर्मचाऱ्यांकडे मिळालेले रेल्वे तिकीट दोन-अडीच महिन्यापूर्वी खरेदी केलेली आहे. आज उघडकीस आलेले प्रकरण केवळ हिमनगाचे टोक आहे. तीन वर्षांपूर्वी अशाप्रकारे ४५ लाख रुपये जप्त करण्यात आले होते, असे रेल्वे सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा यांनी सांगितले.