24 January 2019

News Flash

गारपिटीचा मार: ३०० पोपट, ६० बगळ्यांचा मृत्यू

गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या गारपिटीचा फटका पक्ष्यांना बसत आहे.

पिंपळाच्या झाडाखाली मृत पावलेले पोपट.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका फक्त शेतातील पिकांना आणि माणसांनाच बसला असे नाही तर विदर्भात भंडारा जिल्ह्यात तब्बल ३०० पोपटांचा मृत्यू झाला. त्याचवेळी काटोल तालुक्यातील सुमारे ६० बगळे मृत्युमुखी पडले.

गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या गारपिटीचा फटका पक्ष्यांना बसत आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मंगळवारी रात्री जोरदार गारपीट झाली. यात सुमारे ३०० पोपट मृत्युमुखी पडले. तुमसर येथील शिव मंदिराजवळील पिंपळाच्या झाडांवर पोपटांची वस्ती आहे. मात्र, मंगळवारच्या रात्री अचानक गारपीट सुरू झाली आणि रात्रीच्या वेळी झाडांवर आसरा घेणाऱ्या पोपटांचा घात झाला. गारपिटीमुळे सुमारे ३०० पोपट मृत्युमुखी पडले, तर अनेक पोपट जखमी झाले. लिंबाएवढय़ा गारा अंगावर पडल्याने मृत पावलेल्या पोपटांचा झाडाखाली अक्षरश: सडा पडला होता. गेल्या अनेक वर्षांपासून या झाडावर पोपटांची वस्ती होती आणि गावकरी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना याठिकाणी एकत्र पाहात होते. मात्र, झाडाखाली मृत पोपटांचा सडा पाहून त्यांचेही मन हळहळले.

वनखात्याच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या पोपटांना जमिनीत पुरण्यात आले. भंडारा जिल्ह्यात एकीकडे पोपटांच्या मृत्यूचे तांडव सुरू असतानाच काटोल तालुक्यातील झिलपा गावात सुमारे ६० बगळे मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली. काटोल तालुक्यात जोरदार गारपीट झाली. त्याचा तडाखा जेवढा पिकांना बसला तेवढाच पक्ष्यांनाही बसला. झिलपा गावातील अनेक वृक्षांवर बगळ्यांची वस्ती आहे. यातील एका झाडावर बसलेल्या सुमारे ६० बगळ्यांचा गारपिटीमुळे मृत्यू झाला. पाऊस आणि गारपीट जोरदार असल्यामुळे गावकऱ्यांना घराबाहेरही पडता आले नाही. मात्र, पाऊस थांबताच गावकरी एकत्र आले आणि त्यांनी झाडावरील उर्वरित बगळ्यांचा जीव जाऊ नये म्हणून टायर जाळून बगळ्यांना ऊब देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात गावकरी यशस्वी ठरले आणि सुमारे १०० बगळ्यांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले.

First Published on February 15, 2018 1:36 am

Web Title: 300 parrots death due to hailstorm