गोरेवाडा, स्मार्ट सिटी योजनेलाही निधी

नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ३१० कोटी तर  मिहानसाठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प १४ वर्षांहून अधिक वर्षांपासून सुरू झाला आहे. परंतु अजूनही हवी तशी भरारी घेतली नाही. गोरेवाडा आणि स्मार्टसिटी योजनेसाठीही निधी देण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठी एकूण ४४० कोटींची तरतूद करम्यात आली. त्यात नागपूर मेट्रो रेल्वेचा वाटा हा ३१० कोटींचा आहे. मेट्रोने मागितलेल्या ८५० कोटी रुपयांपैकी ३१० कोटी रुपये महामेट्रोला मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्य सरकारने मेट्रोच्या निधीत ५० कोटींनी  वाढ केली आहे.

दरम्यान येथील जमीन विविध शैक्षणिक, वैद्यकीय शिक्षण संस्था वितरित करण्यात आली आहे. मिहानमध्ये कन्वेशन सेंटर आणि मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. मिहान-सेझमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून उद्योजकांना भूखंड देण्यात येत आहेत. मिहान परिसरात सुविधा केंद्र आणि परिसराचा विकासाठी हा निधी खर्च केला जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने अलिकडे घेतलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमात नागपूरच्या विकासात महत्वाची भूमिका असणाऱ्या मिहान प्रकल्पासाठी ४०६६ कोटींचे सामंजस्य करार केलेआङेत. तसेच  आता अर्थसंकल्पात मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रू. तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मिहान मध्ये १० हजार च्या वर रोजगार निर्माण होतील, असा दावा केला जात आहे.

जयसिंग चव्हाणांच्या प्रस्तावाची दखल

दिव्यांगांसाठी मोबाईल स्टॉल व स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक मदत करावी याबाबत नागपुरातील दिव्यांग उद्योजक जयसिंग चव्हाणा यांनी  दिलेला प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी स्वीकारला असून अर्थसंकल्पात दिव्यांगांना मोबाईल स्टॉल उभारुन देण्यासाठी २५ कोटींची आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारी करीता पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चव्हाण यांना अर्थमंत्री मुंनगंटीवार यांनी अर्थसंकल्पापूर्वी बोलावून एका बठकीत दिव्यांगांसाठी काय तरतूदी करायला हव्या याबाबत सूचना मागितल्या होत्या. चव्हाण यांनी दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीकडे लक्ष वेधले होते. मोबाईल स्टॉल उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती.  तसेच दिव्यांगांना स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी आíथक मदत व्हावी असाही प्रस्ताव दिला होता.त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसून आल्याने च्हाण यांनी मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

गोरेवाडय़ासाठी २० कोटी

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाकरिता अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत या प्राणीसंग्रहालयातील ‘इंडियन सफारी’चे काम पूर्ण झालेच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे आयेाजित बैठकीत अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते. या निधीमुळे हे काम पूर्ण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १ ते ३१ जुलै २०१८ या दरम्यान १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. निसर्ग पर्यटनासाठी १२० कोटी, बफर क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेसाठी १०० कोटी, संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमासाठी ५४ कोटी ६८ लाख, वनक्षेत्रात वनतळे व सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करण्यासाठी ११ कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासाकीय रोपवाटिकेचे बळकटीकरण व आधुनिकीकरणासाठी ४० कोटी व अकाष्ठ वनौपज व औषधी वनस्पतींचे संकलन, पॅकेजिंग ब्रँडिंग करुन विक्री केंद्र स्थापन करण्यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.