18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

बलात्कार पीडित मूकबधिर तरुणीने बाळाला जन्म दिला

मूकबधिर तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवत एका अज्ञात आरोपीने सतत तिच्यावर बलात्कार केला.

खास प्रतिनिधी, नागपूर | Updated: October 10, 2017 1:55 AM

प्रातिनिधीक छायाचित्र

एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मूकबधिर तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवत एका अज्ञात आरोपीने सतत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ती गर्भवती झाली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या तरुणीने बदनामी टाळण्यासाठी स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असता आठ महिन्यातच तिची प्रसूती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला.

पीडित ३४ वर्षीय मुलगी जन्मापासून मूकबधिर आहे. आई, भाऊ आणि मावस भावासह ती नारी परिसरात राहते. तिची आई व भाऊ मजुरी करतात. आई व भावंडं कामावर निघून गेल्यानंतर ती घरी एकटीच असायची. तिच्या असाह्य़तेचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांपूर्वी तिचे वाढलेले पोट पाहून आईने तिला विचारणा केली असता तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या आईने बलात्कार करणाऱ्यासंदर्भात विचारणा केली. मात्र, मुलीला सांगता येत नव्हते. शिवाय ती बदनामीला घाबरत होती. तिने तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु तिच्या आईने तिला वाचवले. अखेर ३० सप्टेंबरला सर्वासमक्ष तिने स्वत:च्या अंगावर केरोसीन ओतले व जाळून घेतले. त्यानंतर तिच्या आई व भावंडांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. तिची पूर्ण साडी जळाली होती. आग विझवल्यानंतर तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर तेथे उपचार सुरू असताना आठ महिन्यातच तिची प्रसूती झाली व तिने मुलाला जन्म दिला. तर दुसरीकडे पोलिसांनी एका मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षिकेमार्फत मुलीशी संवाद साधला व आरोपीविरुद्ध माहिती विचारली. त्यावेळी तिच्या शाळेत १२ वी पर्यंत शिकत असलेल्या एका तरुणाने हे केल्याचे समजले. त्याला पोलिसांनी शोधले असून हर्षवर्धन असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, डीएनए चाचणीनंतरच आरोपीने बलात्कार केला का? हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांनी सांगितले.

First Published on October 10, 2017 1:55 am

Web Title: 34 year rape victim deaf girl gives birth to child