‘एप्रिल’मध्ये ५४ टक्के नापास ल्ल पूर्व नागपुरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्थिती

पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालवण्याकरिता हव्या असलेल्या कायम परवान्याच्या विविध परीक्षेत ३५ टक्के उमेदवार अनुत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. एप्रिल २०१५ मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी तब्बल ५४ टक्के होती. तेव्हा नागपूरकरांना वाहन चालवण्याचे परवाने मिळवण्याकरिता वाहतूक नियमांचा जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. या अभ्यासातून वाहतूक नियमांचे पालन झाल्यास शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्याची शक्यता आहे.

नागपूरला पूर्वी एकच प्रादेशिक परिवहन कार्यालय होते, परंतु शहराची वाढती लोकसंख्या व होणारा विस्तार बघता पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने मंजुरी दिली. कार्यालयाला मंजुरी मिळाल्यावरही या कार्यालयाकरिता जागेचा प्रश्न कायम होता. बरेच महिने हे कार्यालय शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या खालच्या मजल्यावर सुरू होते. त्यानंतर डिप्टी सिग्नल, चिखली देवस्थान पाण्याच्या टाकीजवळील नागपूर सुधार प्रन्यासच्या सभागृहात भाडय़ाने हे कार्यालय सुरू झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थानापन्न होताच या विषयावर एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकरिता तातडीने संगणकासह बऱ्याच बाबी उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर या संगणकाच्या उपयोगातून शिकावू वाहन परवान्याकरिता ऑनलाईन परीक्षासह विविध उपक्रम संगणकावर सुरू झाले. पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित शहरातील ६० टक्केहून जास्त भाग असतानाही अद्याप हव्या त्या प्रमाणात येथे कर्मचारी उपलब्ध नाहीत, परंतु त्यानंतरही येथील सेवेवर असलेले कर्मचारी सेवा देत आहेत. या कार्यालयात एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१५ दरम्यान तब्बल १५ हजार ४२८ नागरिकांनी कायम वाहन चालवण्याच्या परवान्याकरिता अर्ज केला.

त्यातील ५ हजार ३२४ उमेदवार विविध परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी ६५ टक्के असली तरी शहरात वाहतूक व्यवस्था सुदृढ करण्याकरिता वाहनाचा परवाना घेणाऱ्यांकडून वाहतूक नियमांचा आणखी अभ्यास करवून घेण्याची गरज आहे. शहरात सध्या वाहन चालवण्याचा परवाना असलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे, परंतु त्यानंतरही शहरात सर्वच भागात वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे शहरात अपघातांचीही संख्या वाढत चालली आहे. त्यावर नियंत्रणाकरिता शहरात नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना देण्यापूर्वीच त्यांच्याकडून वाहतूक नियमांचा सगळा अभ्यास करवून घेण्याची गरज आहे. त्याचे पालन झाल्यावर रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लागेल.