तरुणाईच्या जगण्याची दृष्टीच बदलली

नागपूर : महाविद्यालये विद्यार्थ्यांची बौद्धिक भूक भागवतात, पण त्यांची समाजाशी नाळ  संस्कार शिबिरातूनच जोडली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील ‘निर्माण’च्या शिबिरांनी बौद्धिक भूक भागलेल्या विद्यार्थ्यांची नाळ समाजाशी जोडण्याचे काम केले आहे. ‘निर्माण’मध्ये घडलेले सुमारे ३५० विद्यार्थी ग्रामीण भागात  पूर्णवेळ सेवा देत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील ‘शोधग्राम’सर्च येथे १८-२८ वयोगटातील युवक-युवतींना घडवण्याचे काम ‘निर्माण’च्या शिबिरातून केले जाते. शिक्षण, नोकरी, निवृत्ती याहून जीवनात काही वेगळे असते का, पैसे कमावण्यापलीकडे अधिक अर्थपूर्ण जीवन शक्य आहे का, आपल्यातील कौशल्य आणि क्षमतांचा वापर समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, या सर्वाची उत्तरे  शिबिरात आल्यानंतर मिळतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ३५९ तालुक्यांपैकी २३६ तालुक्यातून सुमारे १२०० विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत, तर महाराष्ट्राबाहेरील पंजाब, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार यासह सुमारे १६ इतर राज्यातील विद्यार्थीदेखील शिबिरात येत आहेत. या विद्यार्थ्यांचा सहभाग फक्त शिबिरापुरताच नाही. शिबिर संपल्यानंतर अनेक विद्यार्थी याच जिल्ह्यात त्यांची सेवा देत आहेत.

शहरातील मुले ग्रामीण भागात फारशी रमू शकत नाहीत, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, ‘निर्माण’च्या शिबिराने तरुणाईची जगण्याची दृष्टीच बदलली आहे. ठाण्याच्या डॉ. मृदुला भोई आज गडचिरोली जिल्ह्यातील बेलनवाडी येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील म्हस्के डोंगरगावच्या डॉ. सुरज म्हस्केची कथा वेगळीच आहे. संयुक्त कुटुंबात वाढलेल्या डॉ. सूरजचे कुटुंब चंद्रपूरला स्थायिक झाले. आजोबा व्यावसायिकांकडे दिवाणजी म्हणून तर वडील विजेची उपकरणे, कुलर दुरुस्तीची कामे करायचे. त्यामुळे नियोजनपूर्वक आणि वेळेत काम करण्याचे कसब त्यांच्याकडूनच कळले. शिवाय ग्रामीण भागातील वैद्यकीय वास्तव अनुभवले होते. त्यामुळे डॉक्टर होऊनच ग्रामीण भागातील परिस्थिती बदलण्याचा निर्धार त्याने केला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना ‘निर्माण’च्या शिबिरात त्याने सहभाग घेतला. या शिबिरात भारतातील, महाराष्ट्रातील व सोबतच जगभरातील वैद्यकीय व्यवस्थेचे चित्र कळले. ‘निर्माण’च्या अनुभवाचा आधार घेत वर्षभराचा, पाच वर्षांचा व दहा वर्षांच्या ध्येयाचा आराखडा त्याने बनवला. कुटुंबासाठी आर्थिक नियोजनही केले. इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर ‘सर्च’ संस्थेत आदिवासी भागात फिरत्या वैद्यकीय पथकाचा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. वर्षभर त्याने ही जबाबदारी पार पाडली. जानेवारी २०१९ पासून छत्तीसगड राज्यातील दल्लीराजहरास्थित शहीद रुग्णालयात आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. सूरज म्हस्के काम पाहात आहे. विशेष म्हणजे, गेल्या सात महिन्यात एकटय़ाने ५७५ प्रसूती यशस्वीरित्या केल्या आहेत.

‘निर्माण’ची शिक्षणप्रक्रिया ही मोफत दिलेली प्रक्रिया आहे. युवक-युवतींचा शैक्षणिक विकास महाविद्यालयात होतो, पण त्यांचा बौद्धिक व सामाजिक  विकास या शिबिरातून होतो. शिबिरात सहजासहजी कुणालाही प्रवेश दिला जात नाही, तर राज्यभरात मुलाखती होऊन शिबिरार्थीची निवड केली जाते. ‘निर्माण’चे दहावे शिबीर जानेवारी २०२० मध्ये सुरू होत आहे. या शिबिराकरिता १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान राज्यात मुलाखती होऊन ३१ ऑक्टोबरला शिबिरार्थीची यादी जाहीर होणार आहे.

– अमृत बंग, ‘शोधग्राम’ सर्च, गडचिरोली