चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : शहर परिसरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ३६ टक्के रुग्ण  मध्यम ४५ ते ६० वर्षे वयोगटातील असून त्यांना पूर्वीचे काही आजार होते असे आढळले आहे.

करोना मृत्यू संख्येत होत असलेली  वाढ सर्वासाठी चिंतेची बाब ठरली आहे. विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बाधितांच्या मृत्यूची कारणे वयोगटनिहाय जाणून त्यानुसार उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. या कार्यालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार २ ऑगस्टपर्यंत  जिल्ह्यत एकूण झालेल्या मृत्यूंपैकी  ४५ टक्के रुग्ण ६० वर्षांखालील  आहे. त्यांना करोना होण्यापूर्वी इतर आजार होते. ३६ टक्के रुग्णांचा वयोगट ४५ ते ६० वर्षे, १६ टक्के रग्णांचा वयोगट ३० ते ४५ आणि ३ टक्के प्रमाण ३० वर्षांपेक्षा खालील रुग्णांचे आहे.

नागपूरचा विचार करता शहरातील एकूण मृत्यू पैकी ४९ टक्के मृत्यू ६० वर्षांखालील, ३६ टक्के ४५ ते ६० या वयोगटातील,१२ टक्के मृत्यू ३० ते ४५  वर्षे या वयोगटातील आणि ३ टक्के मृत्यू हे ३०  वर्षांखालील आहेत.

ग्रामीण भागातील प्रमाण किंचित वेगळे आहे. येथे एकूण मृत्यूपैकी ३२ टक्के मृत्यू ६० वर्षे वयापेक्षा जास्त व्यक्तीचे आहेत. ३६ टक्के मृत्यू ४५ ते ६० आणि ३२ टक्के ३० ते ४५ या वयोगटातील आहेत.