पुन्हा ९१ रुग्णांचा मृत्यू; नवीन ६,८९० रुग्णांची नोंद

नागपूर : जिल्ह्य़ात  २४ तासांत पुन्हा ९१ करोना  रुग्णांचा मृत्यू झाला तर ६ हजार ८९० नवीन रुग्णांची भर पडली आहे. नवीन मृत्यूंमुळे १७ एप्रिल ते २० एप्रिल या चार दिवसांतील करोनाच्या एकूण बळींची संख्या थेट ३६८ रुग्णांवर पोहोचली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, १७ एप्रिलला ७९, १८ एप्रिलला ८५, १९ एप्रिलला ११३ रुग्णांचे मृत्यू झाले. आज मंगळवारी २४ तासांत शहरातील ५०, ग्रामीणचे ३४, जिल्ह्य़ाबाहेरील ७ अशा

एकूण ९१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या शहरात ३ हजार ९९८, ग्रामीण १ हजार ५११, जिल्ह्य़ाबाहेरील ९६८ अशी एकूण ६ हजार ४७७ रुग्णांवर पोहोचली आहे. शहरात ४ हजार ८७८, ग्रामीण २ हजार ५, जिल्ह्य़ाबाहेरील ७ असे एकूण ६ हजार ८९० नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या २ लाख ४९ हजार ७१४, ग्रामीण ८५ हजार ४९६, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार १५० अशी एकूण ३ लाख ३६ हजार ३६० रुग्णांवर पोहोचली आहे. तर दिवसभरात शहरात १६ हजार ११२, ग्रामीण ९ हजार ९६८ असे एकूण २६ हजार ८० रुग्णांनी चाचणीसाठी नमुने दिले.

विदर्भात करोनाचे २४१ बळी

विदर्भात  २४ तासांत २४१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर १४ हजार ६५८ नवीन रुग्णांची भर पडली. नागपूर आणि भंडाऱ्यात मृत्यूसंख्या सातत्याने जास्त असल्याने चिंता वाढली आहे. नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ५०, ग्रामीण ३४, जिल्ह्य़ाबाहेरील ७, असे एकूण ९१ मृत्यू झाले. येथे ६ हजार ८९० रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात ३० रुग्णांचा मृत्यू तर ८६६ रुग्ण, अमरावतीत ११ मृत्यू तर ७०० नवीन रुग्ण, चंद्रपूरला १६ मृत्यू तर १ हजार ४२५ रुग्ण, गडचिरोलीत १५ मृत्यू तर ६१५ रुग्ण, गोंदियात २१ मृत्यू तर ९२५ रुग्ण, यवतमाळला २९ मृत्यू तर ८५० रुग्ण, वाशीमला २ मृत्यू तर ३८६ रुग्ण, अकोल्यात ८ मृत्यू तर ४८२ रुग्ण, बुलढाण्यात ६ मृत्यू तर ७९० रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात १२ मृत्यू तर ७३० रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूंमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील ३७.७५ टक्के मृत्यूंचा समावेश आहे.

लसीकरण आढावा

पहिली मात्रा

आरोग्य सेवक       – ४१८६८

फ्रंट लाईन वर्कर      – ३९४१५

४५ अधिक  वयोगट    – ८२३२७

४५ अधिक कोमार्बिड     – ६९८६७

६० अधिक सर्व नागरिक – १,५०,८९०

एकूण  –      ३,८४,३६७

दुसरी मात्रा

आरोग्य सेवक           – १७०५४

फ्रंट लाईन वर्कर         –  ९८६८

४५ अधिक वयोगट      – २३३४

४५ अधिक कोमार्बिड    –  ३२८९

६० अधिक सर्व नागरिक –  ११९२६

एकूण –                    ४४,४७१

साडेपाच हजार व्यक्ती करोनामुक्त

शहरात ३ हजार ४५६, ग्रामीण २ हजार ४८ असे जिल्ह्य़ात एकूण ५ हजार ५०४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख १ हजार ७६५, ग्रामीण ५६ हजार ४२६ असे एकूण २ लाख ५८ हजार १९१ व्यक्तींवर पोहचले आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्य़ात सातत्याने दैनिक करोनामुक्तांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या अधिक आढळत आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण घसरून ७६.८० टक्क्यांवर पोहोचली आहे.

नाकाबंदीच्या ठिकाणी २३८ जणांची अँटिजेन चाचणी

शहरातील विविध नाकाबंदीच्या ठिकाणी  मंगळवारी २३८ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १२ जणांना करोनाचे निदान झाले. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांकडून जवळपास ६५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी पोलिसांकडून विविध स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे. यात अँटिजेन चाचणीचाही समावेश आहे. मंगळवारी विनामुखपट्टी फिरणारे १५८, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या ४६७ जणांवर कारवाई करून १७६ वाहने जप्त करण्यात आली.

सक्रिय रुग्णांची संख्या ६१ हजार पार

शहरात ४३ हजार ६५७, ग्रामीण २८ हजार ३५ असे जिल्ह्य़ात एकूण ७१ हजार ६९२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ८ हजार ६१० रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये  तर ६३ हजार ८२ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

खाटांची उपलब्धता

शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालय मिळून बाधितांसाठी किती खाटा (बेड्स) उपलब्ध आहे याची माहिती  http://www.nZcnagYpur.gYov.in व http://nsscdcl.orgY/covidbeds वर क्लिक करुन घेता येईल. तसेच हेल्पलाईन  ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आय.सी.यू. प्राणवायू, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. मंगळवार रात्री ९ वाजेपर्यंत प्राणवायू खाटा २५ आणि प्राणवायू नसलेल्या ११ खाटा  उपलब्ध होत्या.