चार वर्षांत ७५ गुन्हे दाखल

नागपूर : गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक फसवणुकीच्या प्रमाणात वाढ  झाली आहे. २०१५ पासून शहरात एकूण ७५ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातून नागपूरकरांची ३६८ कोटी रुपयांनी फसवणूक झाली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दामदुपटीचे आमिष दाखवून लोकांची गुंतवणूक स्वीकारायची, काही दिवस चांगला परतावा देऊन विश्वास निर्माण करायचा. त्यानंतर लोकांकडून कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारून बेपत्ता व्हायचे, असा गोरखधंदा अनेकांनी सुरू केला. याबाबत महादेव लँड डेव्हलपर्स, श्रीसूर्या, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आदींची नावे घेता येईल. या माध्यमातून २०१५ पासून शहरात वेगवेगळया कंपन्यांनी ५७ हजार ९०४ जणांची ३६८ कोटी ३७ लाख ८९ हजार ९८९ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. अशा स्वरूपाचे ७५ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी १२ गुन्हे बँकांशी निगडित आहेत, तर १३८ आरोपींना अटक करण्यात आली. यात प्रामुख्याने अरविंद सहकारी बँक, एलिना एम्प्लॉयमेंट रिसोर्सेस फार्म, वासनकर इन्व्हेस्टमेंट, शिक्षक सहकारी बॅंक, शेअर बाजार, शिष्यवृत्ती, व्ही.व्ही. इन्व्हेस्टमेंट, विनस एफ. एक्स. कंपनी, बिट क्वॉईन, साईप्रकाश डेव्हलपमेंट, क्यू नेट विहान, समृद्धी जीवन आदी प्रकरणातील आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपींकडून आतापर्यंत १४७ कोटी ४५ लाख ५० हजार ९३४ रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने माहितीच्या अधिकारात माहिती कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिली.