रुग्णालयांतील गंभीर रुग्णसंख्याही ६६६ वर

नागपूर : मागील २४ तासांत जिल्ह्य़ात तब्बल ३९१ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. करोनाग्रस्त वाढत असल्याने  विविध रुग्णालयांत दाखल गंभीर रुग्णांची संख्याही थेट ६६६ वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसांपासून दैनिक रुग्णांची संख्या २०० ते ३०० दरम्यान होती.  बाधित कमी होत असल्याचे संकेत असतानाच बुधवारी जिल्ह्य़ात ४,८८१ चाचण्यांमधून ३९१ रुग्णांना करोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यात शहरातील ३५१, ग्रामीण ३८, जिल्ह्य़ाबाहेर २ अशा एकूण ३९१ रुग्णांचा समावेश होता. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील बाधितांची संख्या १ लाख ८ हजार ९४४, ग्रामीण २७,१५४, जिल्ह्य़ाबाहेरील ९०० अशी एकूण १ लाख ३६ हजार ९९८ रुग्णांवर पोहोचली आहे. दरम्यान २४ तासांत शहरात ३, ग्रामीण २, जिल्ह्य़ाबाहेरील २ असे एकूण ७ बाधितांचे मृत्यू झाले. त्यामुळे आजपर्यंत शहरातील मृत्यूंची संख्या २,७४०, ग्रामीण ७५२, जिल्ह्य़ाबाहेरील ७१८ अशी एकूण ४,२१० रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात २१९, ग्रामीण ३९ असे एकूण २५८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोनामुक्तांची संख्या १ लाख ३ हजार ७०९, ग्रामीण २५,८११ अशी एकूण १ लाख २९ हजार ५२० व्यक्तींवर पोहोचली आहे.

अरुण गवळीसह पाच कैद्यांना करोना

कुख्यात गुंड अरुण गवळीसह पाच कैद्यांना करोनाची लागण झाली असून त्यांना मध्यवर्ती कारागृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती खालावली. त्याच्यासह अन्य कैद्यांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल बुधवारी आला. यात गवळीसह पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाचही जणांचे कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्यावर उपाचार सुरू करण्यात आले. पाचही जणांची प्रकृती स्थिर आहे.

करोनापश्चात केंद्र सक्षम करा – डॉ. म्हैसेकर 

जिल्ह्य़ात करोनामुक्त व्यक्तींची संख्या मोठी आहे. त्यांना करोनानंतर येणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांचे निराकरण  गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्य़ातील करोनापश्चात केंद्र अधिक सक्षम करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांचे करोनाविषयक सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली. येथील बचत भवनात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, डॉ. देव, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते.