खासगी कर्मचाऱ्यांची मदत * प्रवाशांचे हाल कायम

शहर बसचा संप मिटला, असा दावा कर्मचारी संघटनेने केला असला तरी प्रत्यक्षात कर्मचारी कामावर आले नाही. त्यामुळे खासगी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाने केला. मात्र, सांयकाळपर्यंत फक्त ४० टक्केच बसेस रस्त्यावर धावू शकल्या. त्यामुळे प्रवाशांचे दुसऱ्याही दिवशी हाल झाले.

शासनाने निश्चित केल्याप्रमाणे किमान वेतन मिळावे, या मागणीसाठी  शहर बसच्या (आपली बस) कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मंगळवारी रात्री शासनाने आंदोलकांवर मेस्मा लावला होता. संपाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय कामगार सेनेने संप मागे घेत असल्याचा दावा केला, परंतु काही वेळातच त्यांची भूमिका बदलली व संप कायम असून न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात आले. शेवटी शहर बस संचालकांनी स्कूलबस चालवणारे आणि खासगी बस चालवणाऱ्या चालकांना  तात्पुरत्या स्वरूपात सेवेवर घेऊन सकाळी १०.३० पासून बससेवा सुरू करण्यात आली. बस सुरू झाल्यावर आंदोलकांमध्ये फाटाफूट होऊन काही कर्मचारी सेवेवर परतले. आंदोलकांची संख्या जास्त असल्याने दुपारी २ पर्यंत केवळ १० टक्के, तर सायंकाळी ५ पर्यंत ४०  टक्केच बस सेवा देत होत्या.  दरम्यान, अत्यल्प बस रस्त्यांवर असल्याने नागरिकांना शाळा, कामाचे ठिकाण व इतर कामांसाठी विविध ठिकाणी जाण्यासाठी त्रास झाला. सकाळी आंदोलकांनी पटवर्धन मैदानासह इतर बस डेपो गाठत बस प्रवासी वाहतुकीसाठी निघू नये म्हणून प्रयत्न केले,  परंतु काही नेत्यांनी मध्यस्थी करत अडथळा  निर्माण न करण्याची विनंती केल्याने कामगारांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले.

महापालिकेची खासगी कंपन्यांना नोटीस

महापालिकेने शहर बससेवा संचालित करणाऱ्या पाच खासगी कंपन्यांना नोटीस बजावली. प्रवाशांची गैरसोय झाल्याने कंपनीला नियमानुसार दंड होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या वृत्ताला महापालिकेच्या परिवहन विभागाचे जगताप यांनी दुजोरा दिला.

मनपाला ३५ लाखांचा फटका

कामगारांच्या संपामुळे महापालिकेला ३५ लाख रुपयांचा फटका बसला. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून बुधवारी ६० नवीन चालकांची नियुक्ती करून खासगी ऑपरेटरकडून ५० खाजगी ट्रॅव्हल्स आणि इतर चालक मिळवून १४५ बस चालवण्यात आल्या. हिंगणा नाक्यावर एका बसच्या तोडफोडीबाबत सूचना आल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

 – बंटी कुकडे, सभापती, परिवहन समिती, महापालिका

सायंकाळपर्यंत ५० टक्के सेवा पूर्ववत

बाहेरच्या काही चालक-वाहकांच्या मदतीने सकाळी शहर बससेवा सुरू करण्यात आली. सायंकाळपर्यंत आंदोलकांतील २५० च्या जवळपास कर्मचारी सेवेवर रूजू झाले. त्यामुळे एकूण ३७५ पैकी सुमारे १५० बस प्रवासी सेवेकरिता रस्त्यांवर आणण्या गेल्या.  गुरुवापर्यंत शहर बससेवा पूर्ववत होईल.

– सत्यनारायण तिवारी, प्रकल्प व्यवस्थापक, डिम्स, नागपूर</strong>