पर्यावरण आणि आरोग्यास हानीकारक ठरलेल्या प्लॅस्टिकचा खुलेआम वापर सुरू असून त्याचे प्रशासन आणि नागरिकांनाही सोयरसुतक नाही. अधुनमधून प्लॅस्टिक पिशव्या जप्तीची मोहीम हाती घेतली जाते आणि काही दिवसातच ती थांबवली जाते. शहरातील विविध वर्दळीच्या ठिकाणी आणि उद्यानात प्लॅस्टिक फेकून दिले जाते. ते खाण्यामुळे ४० टक्के गाईंना वेगवेगळे आजार झाल्याचे समोर आले आहे.
महापालिकेचा आरोग्य विभाग कारवाई करीत असला तरी ती काही काळापुरतीच असते, त्यानंतर दुर्लक्ष केले जाते. खाण्याचे पदार्थ प्लॅस्टिकच्या पिशवीत आणले जातात. काम झाल्यानंतर त्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या जातात. शहरातील उद्यान, तलावाच्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती आहे. अनेक महिला घरातील शिळे अन्न प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून ते रस्त्यावर किंवा कचऱ्याच्या ठिकाणी टाकतात. पावसाळ्यामध्ये मोठय़ा प्रमाणात जनावरे शहरातील विविध भागात फिरत असताना अशा प्लॅस्टिक पिशव्या त्यांच्या पोटात जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गाईंचे आजार वाढले. गोधन ग्रामसेवा समितीने केलेल्या एका सर्वेक्षणात गाईंना प्लॅस्टिक पोटात गेल्याने आजार झाल्याचे समोर आले आहे.
विशेषत: बाजारामध्ये भाजीवाला, फळवाला, किराणा दुकान, खाद्य वस्तू विक्री दुकान, औषधे आदी सर्वच ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरू आहे. याच पिशव्यांमधून टाकाऊ अन्न वा वस्तू अनेक लोक फेकून देत असतात. विशेषत उद्यान परिसरात लोकांच्या निष्काळजीपणाचा कहर झाला आहे. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर तसेच पाळीव प्राणी, वन्यजीवांवर होतो. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साठू लागले की, आपण शासन व प्रशासनावर टीका करतो, पण सामान्य नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यात आपण दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जनतेमध्ये या संदर्भात जनजागृती व्हावी या दृष्टीने गोधन ग्रामसेवा समितीच्या वतीने मोहीम राबविले जात आहे. गीता मंदिरमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर कॉटेन मार्केट परिसरात प्लॅस्टिक आणि कचरा खात असलेल्या गाईंना चारा देण्यात आला.

गाईना प्लॅस्टिक खाण्यापासून वाचवा
गोधन ग्रामसेवा समितीने शहरातील विविध भागातील गो शाळेत सर्वेक्षण केले असता त्यात ४० टक्के गाईंना आजार प्लॅस्टिकमुळे होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संस्थेने गाईला प्लॅस्टिकपासून वाचविण्यासाठी ‘चारा डालो आणि प्लॅस्टिक हटावो’ मोहीम सुरू केली आहे. इतरत्र फेकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या प्राणी खातात. प्लॅस्टिकमधील वस्तू नष्ट होतील पण प्लॅस्टिक नष्ट होत नाही. हेच प्लॅस्टिक प्राण्यांच्या पोटात अडकून राहते. त्यामुळे प्राण्यांचे जीवन धोक्यात येते. प्लॅस्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. अनेकजदा घशात अथवा श्वास नलिकेत अडकून प्राण्याचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे गाईंना वाचविण्यासाठी नागरिकांनी प्लॅस्टिकचा उपयोग टाळावा आणि या मोहिमेत सहभागी होऊन गाईंना चारा देण्यासाठी सहकार्य करावे.
– सुरेंद्र सिंह, मोहीम संयोजक, गोधन ग्रामसेवा समिती.