रक्कम उत्पादकांच्या खात्यात जमा करणार; विदर्भात २० केंद्रांवर खरेदीस सुरूवात
राज्यात गुरुवारपासून सुरू झालेल्या कापूस खरेदीच्या पहिल्या दिवशी ४०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांना यंदा कापसाच्या रकमेचे धनादेश मिळणार नाहीत, तर सर्व रक्कम त्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे, असे कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष एन.पी. हिराणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जागतिकस्तरावर कापूस बाजारपेठेत यंदाही मंदी असल्याने उत्पादन कमी झाले तरी बाजारात भाव वाढण्याची शक्यता कमीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाने २०१५-१६ या वर्षांसाठी सीसीआयचे उपअभिकर्ते म्हणून कापूस उत्पादक पणन महासंघाची नियुक्ती केली. त्यानुसार ५ नोव्हेंबरपासून विदर्भात २० केंद्रावर खरेदी सुरू केली. नागपूरमध्ये विनायका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी, चिमणाझरी येथे हिराणी यांच्या हस्ते खरेदीचा शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी विविध केंद्रांवर एकूण ४०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. प्रत्येक कापूस उत्पादक जिल्ह्य़ात एक याप्रमाणे ७ नोव्हेंबरला २० खरेदी केंद्रे सुरू केले जाणार आहेत. तीन टप्प्यात एकूण ९६ केंद्रे सुरू करण्यात येणार असून, गरज भासल्यास केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल, असे हिराणी यांनी सांगितले.
या वर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाच्या पैशाचा धनादेश मिळणार नाही, तर ही रक्कम लगेचच त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीच्या वेळी सातबाराचा उतारा, आधार कार्ड, कोरा धनादेश, बँक खात्याचा क्रमांक, पासबूकची झेरॉक्स आदी कागदपत्रे सोबत आणणे अपेक्षित आहे.
सध्या हमी भावाने म्हणजे ३९०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल या दराने कापूस खरेदी केली जाईल. यामुळे व्यापाऱ्यांना यापेक्षा जास्त भाव द्यावे लागेल. गेल्या वर्षी महासंघाने २७ लाख क्विंटल कापूस खरेदी केला होता. त्यापोटी १०६६.४ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले होते. खरेदी केलेल्या कापसापासून ५ लाख ६०८८४ गाठी तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३०६० गाठी शिल्लक आहेत. यंदा १०० लाख क्विंटल कापूस खरेदी करण्याची महासंघाची तयारी आहे. यासाठी शासनाने सुरुवातीला ५० कोटी रुपये दिले असून, या आधारावर महासंघ १ हजार कोटी रुपये निधी उभा करेल व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील, अशी माहिती हिराणी यांनी दिली.

जागतिक बाजारात मंदीच
कापूस उत्पादनात भारत आता पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिकस्तरावर २०१५-१६ या वर्षांत कापूस लागवड क्षेत्रात ६ टक्के घट होण्याची शक्यता आहे. भारतात हे प्रमाण ५ टक्के राहील. उत्पादनातही जागतिकस्तरावर ६ टक्के घट येण्याची शक्यता असून, २००९-१० या वर्षांनंतरचा हा निचांक असेल. भारतात ६.५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. जागतिकस्तरावर २२ टन कापूस शिल्लक आहे. भारतातही ७८ लाख गाठी शिल्लक आहेत. त्यामुळे उत्पादन कमी झाले तरी भाव वाढण्याची शक्यता नाही, असे हिराणी यांनी स्पष्ट केले.